चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:42 AM2021-09-10T04:42:07+5:302021-09-10T04:42:07+5:30

हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप चिखली : लुधियाना येथे कर्तव्यावर असताना परेडदरम्यान निधन झालेल्या चिखलीचे वीर सुपुत्र श्याम प्रकाश शिंदे ...

Chikhali's heroic son merges into infinity! | चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन !

चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन !

Next

हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

चिखली : लुधियाना येथे कर्तव्यावर असताना परेडदरम्यान निधन झालेल्या चिखलीचे वीर सुपुत्र श्याम प्रकाश शिंदे यांना ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला.

स्थानिक जुने गाव परिसरातील अंधारा महादेव मंदिर परिसरातील शहीद जवान श्याम प्रकाश शिंदे लुधियाना येथे ते कार्यरत होते होते. ७ सप्टेंबरला सकाळी ६ वाजेच्या सुमारास अकस्मातपणे चक्कर येऊन ते खाली कोसळले व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, लष्करी औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर शहीद श्याम शिंदे यांचे पार्थिव ९ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी नेण्यात आले. याठिकाणी शहीद शिंदे यांच्या पत्नी स्वाती श्याम शिंदे, आई कावेरीबाई आणि अवघ्या ११ वर्षांचा अनिरुद्ध व सहा वर्षांचा देवांश ही दोन मुलं यांनी टाहो फोडताच उपस्थित कुटुंबीय, आप्त-स्वकीय आणि मित्रपरिवाराचा शोक अनावर झाला होता. त्यानंतर अग्निविधीसाठी जुनेगाव स्मशानभूमी येथे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. यावेळी माजी आ. राहुल बोंद्रे, नगराध्यक्ष प्रिया व कुणाल बोंद्रे, उपाध्यक्षा वजीराबी व शे. अनिस, प. सं. सभापती सिंधू तायडे, अंकुशराव पडघान, प्रा. नरेंद्र खेडेकर, मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड, रामदास देव्हडे, पंडितराव देशमुख, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, गोपाल देव्हडे, नामू गुरूदासाणी, संजय अतार, सुदर्शन भालेराव, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार अजितकुमार येळे, ठाणेदार अशोक लांडे, मुख्याधिकारी सुरडकर यांनी पुष्पचक्र वाहून शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. शहीद शिंदे यांचे मोठे बंधू अनंता शिंदे यांनी पार्थिवाला अग्नी दिला.

--पहिल्याच प्रयत्नात झाले होते सैन्यात दाखल--

२४ जून १९८५ ला जन्मलेले जुने गाव परिसरातील वीर जवान श्याम प्रकाश शिंदे यांनी आपले शालेय शिक्षण स्थानिक आदर्श विद्यालयात पूर्ण केले होते. शालेय जीवनापासूनच सैन्यदलात दाखल होण्याचे त्यांचे स्वप्न होते. कठोर परिश्रमाच्या जोरावर २००४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते सैन्यदलात दाखल झाले होते. १५ दिवसांपूर्वी ते जम्मू येथून बदली झाल्याने लुधियानाजवळील भटिंडा येथे आले होते. येथे ७ सप्टेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकहून परतल्यानंतर वर्कशॉपमध्ये चक्कर येऊन ते खाली कोसळले त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई कावेरीबाई, पत्नी स्वाती, दोन मुले, भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे.

Web Title: Chikhali's heroic son merges into infinity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.