चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:30 AM2018-01-31T00:30:54+5:302018-01-31T00:31:08+5:30

चिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटका दिला आहे.

Chikhli Panchayat Samiti's cast certificate cancellation! | चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द!

चिखली पंचायत समितीच्या दोन सदस्यांचे जात प्रमाणपत्र रद्द!

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेस-भाजपाला जोरदार झटका : पंचायत समिती वतरुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: अकरा महिन्यांपूर्वी झालेल्या चिखली पंचायत समिती निवडणुकीपश्‍चात सभापती-उपसभापती निवडणुकीच्यावेळी झालेल्या प्रचंड गदारोळानंतर सत्तेत वाटेकरी असलेल्या काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांना उण्यापुर्‍या वर्षभराच्या आतच प्रशासनाने चांगलाच जोरदार झटका दिला आहे. राखीव गणातून विजयी झालेल्या दोन सदस्यांनी निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्न सादर न केल्याने त्यांचे पं.स. सदस्यत्व रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी पारित केले आहेत. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य काँग्रेसचा तर एक भाजपाचा असल्याने उभय पक्षांच्या पायाखालील वाळू सरकली असून, यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचे गणित पुन्हा एकदा बिघडण्याचे संकेत असल्याने पं.स. वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ४ ऑगस्ट २0१६ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १२-अ, ४२(६)(अ), ६७(७-अ) नुसार राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात यावी, अशी तरतूद आहे. त्यानुसार फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत करवंड या राखीव गणातून विजयी झालेले गजानन बाळकृष्ण इंगळे व सवणा या राखीव गणातून निवडून आलेल्या शे. फरीदाबी नासेर या दोन सदस्यांनी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांनी संबंधित विभागास दिला होता. त्यावरून जात प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांना अपात्रतेचे औपचारिक आदेश पारित करण्याच्या अधिकारानुसार जिल्हाधिकार्‍यांनी गजानन इंगळे व शे. फरीदाबी नासेर या दोन सदस्यांची  निवड रद्द केल्याचे आदेश पारित केले आहेत. या कारवाईने या दोन्ही सदस्यांना चांगलाच धक्का बसला आहे.     

सत्ता समीकरण बिघडण्याची शक्यता!
एकूण १४ सदस्य संख्या असलेल्या चिखली पंचायत समितीमध्ये भाजपा ७, काँग्रेस ५, शेतकरी संघटना १ आणि शिवसेना १ असे पक्षीय बलाबल आहे. असे असताना १४ मार्च २0१७ रोजी पडलेल्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या एका सदस्याने गैरहजेरी दर्शविली तर शिवसेना व शेतकरी संघटनेने काँग्रेसला सहकार्य केल्याने सभापतीपद काँग्रेसकडे गेले तर उपसभापतीपद मोठय़ा गदारोळानंतर भाजपाच्या वाट्याला आहे. त्या पश्‍चात आता दोन सदस्यांचे पद रद्द झाल्याने पं.स. वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पद रद्द झालेल्या सदस्यांपैकी एक सदस्य काँग्रेसचा तर एक भाजपाचा असून, हे दोन्ही पक्ष कट्टर विरोधक असले तरी पंचायत समितीच्या सत्तेत वाटेकरी असल्याने दोघांनाही या सदस्य रद्दच्या आदेशाचा फटका बसण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मते सदस्यत्व रद्द झालेल्या दोन्ही पं.स. सदस्यांना घरी बसण्याची वेळ आल्यास पोटनिवडणुकीतून पंचायत समितीतील सत्तेची उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे या दोन सदस्यांमुळे पदारूढ सदस्यांचेही धाबे दणाणले आहे. तर राजकीयदृष्ट्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने यदाकदाचित पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागल्यास ती नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे मोठे औसुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Chikhli Panchayat Samiti's cast certificate cancellation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.