चिखलीत नवीन राजकीय समीकरणाची नांदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:42 AM2018-01-31T00:42:20+5:302018-01-31T00:42:38+5:30
चिखली : शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत बुलडाणाचे तत्कालीन संपर्क प्रमुख तथा खासदार आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या बुलडाणा जिल्हा दौर्यादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी दिलेली भेट सध्या चिखलीतील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. खा.अडसूळांची ही भेट चिखलीतील नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत बुलडाणाचे तत्कालीन संपर्क प्रमुख तथा खासदार आनंदराव अडसूळ यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या बुलडाणा जिल्हा दौर्यादरम्यान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी दिलेली भेट सध्या चिखलीतील राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. खा.अडसूळांची ही भेट चिखलीतील नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.
एकेकाळी परिसरातील आणि जिल्हय़ातीलही शिवसेनेची बुलंद तोफ असा लौकिक असलेले तत्कालीन जिल्हाप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी चिखली विधानसभा मतदार संघातील काही राजकीय समीकरणांना कंटाळून शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला होता. त्यातही काँग्रेसचे अ.भा.महासचिव मुकुल वासनिक यांचे निकटवर्तीय म्हणून प्रा.खेडेकरांनी जिल्हा परिषदेत आधी सभापतीपद आणि नंतर अध्यक्षपद पदरात पाडून घेतले होते; मात्र गेल्या काही दिवसांपासून प्रा. खेडेकर यांच्या राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू असलेल्या चिखली विधानसभा मतदार संघातील राजकीय चित्र आणि समीकरणे याचा विचार करता आता काँग्रेसमध्ये प्रा.नरेंद्र खेडेकरांचे मन रमेना की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, गत काही महिन्यांपासून प्रा. खेडेकर यांचे सोशल मीडियावर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची तसेच प्रा. खेडेकर जिल्हाप्रमुख असतानाची छायाचित्रे व्हायरल होत असल्याने प्रा. खेडेकर यांच्यातला शिवसैनिक अद्यापही जागा असल्याची चर्चा आणि त्यानुसार प्रा. खेडेकर यांच्या आगामी राजकीय प्रवासाबाबतची अटकळे राजकीय वर्तुळात बांधली जात होती. अशातच शिवसेनेच्या केंद्रीय कार्यकारिणीत शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर खा. आनंदराव अडसूळ यांचे एका खासगी सोहळय़ानिमित्ताने चिखलीत आगमन झाले असता, त्यांचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या निवासस्थानी झालेले जंगी स्वागत व सत्काराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, प्रा. खेडेकर यांची खा. प्रतापराव जाधव, खा. अडसूळ यांच्यासह शिवसेना नेत्यांशी वाढत्या जवळीकीने भविष्यातील राजकीय समीकरणाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले असून, येत्या काळात चिखली विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात अनेक राजकीय भूकंप होण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहेत. सद्यस्थितीत शिवसेनेलाही चिखलीत एका दमदार नेतृत्वाची गरज असल्याने प्रा. नरेंद्र खेडेकर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.