अंगावर झाडाची फांदी पडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:54 PM2020-09-30T12:54:10+5:302020-09-30T12:54:19+5:30
फांदीखाली दबून एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर एक युवक जखमी झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर : संग्रामपूर-जळगाव रोडवर चांगेफळ येथून हाकेच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चिंचेच्या झाडाची मोठी फांदी अचानक रस्त्यावर कोसळली. त्या फांदीखाली दबून एका नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर एक युवक जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान घडली.
चांगेफळ येथील नऊ वर्षीय भावेश सुभाष साबे या बालकाच्या अंगावर अचानक चिंचेच्या झाडाची मोठी फांदी तुटून पडली. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या फांदीमुळे जळगाव-संग्रामपूर रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. याच घटनेत दशरथ खंडेराव नामक ४० वर्षीय युवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने झाडाच्या फांदीखाली दबलेल्या चिमुकल्याला बाहेर काढले. फांदी मोठी असल्याने कोवळ्या बालकाचा पाय तुटला होता. नागरिकांनी फांदी हटवल्यावर मृत बालकाच्या शवविच्छेदनासाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे चांगेफळ गावावर शोककळा पसरली. रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांदीला हटविण्याचे काम नागरिकांनी केले. संग्रामपूर तालुक्यातील अलिकडील काळातील ही दुसरी घटना आहे.