आईच्या रक्षाविसर्जनानंतर मुलाचा हृदयविकाराने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना
By विवेक चांदुरकर | Published: May 25, 2024 03:58 PM2024-05-25T15:58:56+5:302024-05-25T16:00:15+5:30
आईचे रक्षा विसर्जन केल्यानंतर संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुलाचा मृत्यू झाला.
योगेश धोटे, निमगाव : आईचे रक्षा विसर्जन केल्यानंतर संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुलाचा मृत्यू झाल्याची घटना २४ मे रोजी संध्याकाळी गावातील दांडगे परिवारात घडली.
निमगाव येथील रुखमाबाई तुकाराम दांडगे (९५) यांचे २२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम २४ मे रोजी झाला. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचा मुलगा माजी सैनिक तुळशीराम तुकाराम दांडगे (६४) यांचाही तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तीन दिवसात घरातील दोन ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू दांडगे परिवारात झाला. तुळशीराम दांडगे हे माजी सैनिक होते. तसेच नांदुरा येथील आयटीआय येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. २४ मे रोजी संध्याकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्या मुलांनी त्यांना तत्काळ नांदुरा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. २५ मे रोजी माजी सैनिक तुळशीराम तुकाराम दांडगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.