ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बालकाचा मृत्यू, आईवडील गंभीर जखमी
By सदानंद सिरसाट | Updated: September 18, 2022 21:14 IST2022-09-18T21:14:41+5:302022-09-18T21:14:50+5:30
नांदुरा : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील आठ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ...

ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात बालकाचा मृत्यू, आईवडील गंभीर जखमी
नांदुरा : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील आठ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू तर त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नांदुरा बायपासनजीक एका ढाब्याजवळ घडली. अपघातातील जखमी वडील दरबारसिंग डाबेराव हे सैन्यात कार्यरत असल्याची माहिती आहे. पती-पत्नीवर खामगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत प्राथमिक प्राप्त माहितीनुसार अपघातग्रस्त डाबेराव कुटुंब दुचाकीने नांदुराकडे जात होते. ट्रक क्रमांक आेडी-०५, जे-२०३५ खामगावकडे येत होता. यावेळी दोन्ही वाहनात झालेल्या अपघातात दुचाकीवर असलेल्या आयुष दरबारसिंग डाबेराव (८) या बालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सैन्यात कार्यरत त्याचे वडील दरबारसिंग डाबेराव (३२), त्यांची पत्नी माधुरी डाबेराव (रा. पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) हे गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर खामगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृत आयुषचे शवविच्छेदन रविवारी सकाळी नांदुरा येथे करण्यात आले. जखमी सैनिक काही दिवसांपूर्वीच सुटीवर आल्याची माहिती आहे. याप्रकरणी जलंब पोलिसात अद्याप फिर्याद दाखल झालेली नाही. पुढील तपास ठाणेदार धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.