चिमुकलीचा विनयभंग! शिक्षकास पाच वर्षांची सक्तमजुरी; खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
By अनिल गवई | Published: August 19, 2023 05:30 PM2023-08-19T17:30:18+5:302023-08-19T17:30:28+5:30
शाळा सुटल्यानंतर पाच वर्षीय चिमुकलीला वर्गात बोलावून विनयभंग करणाऱ्या एका शिक्षकास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
खामगाव : शाळा सुटल्यानंतर पाच वर्षीय चिमुकलीला वर्गात बोलावून विनयभंग करणाऱ्या एका शिक्षकास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शनिवारी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ३१ जानेवारी २०१९ रोजी ही घटना घडली होती. पीडितेच्या वडिलांची तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून आरोपी सुधाकर ओंकार बुंदे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (ए), ३५४(डी), ५०६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ८, १० नुसार तामगाव पोलिसांत ३१ जानेवारी रोजी दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास करून तत्कालीन पीएसआय दिलीप पाटील यांनी दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. कुळकर्णी यांनी कलम ३५४, कलम ३५४(ए), नुसार व कलम १० पोक्सोनुसार गुन्हा सिद्ध होत असल्याने आरोपी सुधाकर कलम ३५४ नुसार २ वर्षे सक्त मजुरी व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच कलम ३५४ (ए) भादविप्रमाणे गुन्हा सिद्ध झाला. तसेच कलम १० पोक्सो अॅक्टअंतर्गत सुद्धा गुन्हा सिद्ध होत असल्याने कलम १० नुसार आरोपी यांस पाच वर्षे सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा व १००० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यात पीडिता, तिचे वडील व वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कार यांनी कामकाज पाहिले. तसेच पोहेकॉ. अमर कस्तुरे यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिले.