थंडीत कुडकुडणा-या बालकांना विद्यार्थ्यांनी दिली मायेची ऊब
By admin | Published: November 14, 2014 10:40 PM2014-11-14T22:40:36+5:302014-11-14T22:40:36+5:30
चिमुकल्यांची आदर्श प्रेरणा, विद्यार्थ्यांनीच जाणल्या गरिब बालकांच्या व्यथा.
ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)
पालावरच्या बालकांच्या व्यथा जाणून, स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बालदिनाचे औचित्य साधुन थंडीत कुडकुडणार्या त्या बालकांना कपडे देऊन मायेची उब देण्याचा स्तुत्य उपक्रम केला.
एकवेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच धडपड सुरू असलेल्या काही कुटुंबांनी जानेफळ रोडला लागून झोपड्यांमध्ये आपला संसार थाटला आहे. त्यांच्याबरोबर त्यांची चिमुकली मुलंही फाटकी वस्त्र व निवार्यांमध्ये थंडीत कुडकुडताना दिसत आहेत. त्यांची शाळाही केवळ स्वप्नातच भरते. त्यांना कुठला बालकदिन आणि कुठले शिक्षक. आज सर्वत्र मुलांच्या हक्काचा दिन 'बालकदिन' म्हणून साजरा करण्यात आला; परंतु स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एक आदर्श प्रेरणादायी बालकदिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी झोपडीत राहणार्या बालकांच्या व्यथा जाणून, त्या मुलांना मदत करण्यासाठी वर्गणी जमा केली. झोपडीतील या मुलांचे दररोज थंडीत कुडकुडणे पाहून विद्यार्थ्यांनी त्यांना कपडे वाटप करून अभिनव बालकदिन साजरा केला. या विद्यार्थ्यांनी स्वत: च्या खाऊच्या पैशातून झोपडीतील मुलांकरिता शैक्षणिक साहित्य व फराळ वाटप केले. या बालकांच्या समस्या जाणून घेतल्या.