आता मुलांना जिल्हा परिषद शाळांचा लळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:13 PM2020-01-01T14:13:14+5:302020-01-01T14:13:45+5:30
नववर्षात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता विकासावर भर दिला जाणार असून जिल्हा परिषद शाळेलाही अच्छे दिन येणार आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कॉन्व्हेंट व इतर खाजगी शाळांनाही लाजवेल असे पाऊल आता जिल्हा परिषद शाळांनी टाकले आहे. त्यामुळे काँन्व्हेंटच्या मुलांनाही जिल्हा परिषद शाळेचा लळा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील दीड हजार शाळा डिजीटल झाल्या आहेत. आता नववर्षात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता विकासावर भर दिला जाणार असून जिल्हा परिषद शाळेलाही अच्छे दिन येणार आहेत.
एकीकडे जिल्हा परिषद शाळा ओस पडत असल्याची ओरड वारंवार ऐकायला मिळते. गेल्या काही वर्षात कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांचे जाळे खेडोपाडी पोहचले आहेत. चकाकणाऱ्या उंच इमारती, शैक्षणिक साहित्य पाहून पालकांनाही भूरळ पडत आहे. परिणामी पालक जिल्हा परिषद शाळा सोडून या खाजगी शाळांकडे वळले आहेत. काँन्व्हेंटच्या या संस्कृतीत जिल्हा परिषद शाळा टिकविण्यासाठी शिक्षण विभागाकडून अटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्ह्यातील दीड हजार शाळा डिजीटल करण्यात आल्या आहेत. प्रयोगशील शाळांवरही भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत व राज्यशासन पुरस्कृत अशा विविध योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जातात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमधून तीन हजार ४१५ विद्यार्थींनी प्रवेश घेतला आहे. जिल्ह्यातील आयएसओ शाळांचा टक्काही वाढला आहे. लोकसहभागातून शाळा ई-लनिंग करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत संगणक संच आल्याने जिल्हा परिषद शाळेतील मुलांमधील संगणकाची भीती दूर झाली आहे. इंटरनॅशनल शाळांची संख्याही सहावर पोहचली आहे. डिजीटल, आयएसओ, इंटरनॅशनल शाळा, व्हीडीओच्या माध्यमातून मुलांना शिक्षण यासारखे नवनवीन बदल जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पाहावयास मिळत आहेत. भौतीक सुविधांही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. या नव वर्षात शाळांच्या गुणवत्तेवर भर दिला जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एजाजुल खान यांनी दिली. त्यासाठी शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये नेमकी काय आखणी करणार हे नव वर्षातच स्पष्ट होईल.