चायनिज मांजाला पोलिसांची ढील; विक्रीमुळे वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:28 AM2021-01-02T04:28:47+5:302021-01-02T04:28:47+5:30
चायनीज मांजावर बंदी असल्याने नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी पारंपरिक व साध्या दोऱ्याचा मांजा वापरावा, असे आवाहन प्राणीमित्रांकडून वारंवार करण्यात येत ...
चायनीज मांजावर बंदी असल्याने नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी पारंपरिक व साध्या दोऱ्याचा मांजा वापरावा, असे आवाहन प्राणीमित्रांकडून वारंवार करण्यात येत आहे; परंतु युवकांकडून चायनिज मांजाचीच मागणी होते. बुलडाणा शहरात अलीकडील काळात मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु यामध्ये चायनिज मांजाचा वापरही वाढत असल्याने पक्ष्यांसाठी हा मांजा धोकादायक आहे.
चायनिज मांजा विकणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाईची गरज
चायनीज मांजामुळे मोठ्या शहरात जीवघेण्या अपघाताचे प्रसंग घडले आहेत. या मांजा विक्रीवर बंदी घातलेली असताना आजही मांजाची सर्रास विक्री होत आहे. बंदीची कडक अंमलबजावणी करून विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून करण्यात येत आहे; परंतु कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने चायनिज मांजाचा वापर सर्रास सुरू आहे.
पक्ष्यांसोबत मानवालाही धोका
चायनिज मांजाचा पक्ष्यांसोबत मानवालाही धोका अधिक आहे. यापूर्वी मांजामुळे रस्ते अपघाताच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. दुचाकीस्वारांचे अपघात होऊन गंभीर जखमी होण्याच्या घटना यामुळे घडल्या आहेत.
मांजामुळे पक्षी मृत्युमुखी
बुलडाणा शहरात पंतगांच्या मांजामुळे गेल्या काही वर्षात पक्ष्यांचा मृत्यू झाला नाही; परंतु काही ठिकाणी पक्षी जखमी होण्याचे प्रकार समोर आले आहेत. यंदा अशी दुर्घटना घडू नये, यासाठी युवकांनी चायनिज व पक्ष्यांसाठी धोकादायक ठरणाऱ्या मांजांचा वापर करणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
चायनिज मांजाचा वापर पक्ष्यांसाठी धोकादायक आहे. बुलडाण्यातही चायनिज मांजाची विक्री होत आहे. त्याचा वापर अनेक युवक करताना दिसून येतात. पक्ष्यांसोबतच मानवाच्या अपघातास चायनिज मांजा कारणीभूत ठरतो.
- अलोक शेवडे, कीटक व पक्षीमित्र.
मकर संक्रांती सणानिमित्त अनेक ठिकाणी पतंग उडवतात. पतंग उडवणे हा मनोरंजनात्मक खेळ असला, तरी अनेक ठिकाणी पतंगासाठी मांजाचा वापर केला जातो. मांजा दोऱ्यात अडकून शहरासह अन्य ठिकाणी जीवघेणे अपघात घडले आहेत. त्यामुळे या मांजावर असलेल्या बंदीची अंमलबजावणी व्हावी.
- प्रभाकर वाघमारे, पर्यावरण प्रेमी.