महिला साहित्यावर रंगले विचार मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:23 PM2019-08-26T16:23:16+5:302019-08-26T16:23:30+5:30
महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ताराबाई शिंदे साहित्य नगरीत पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन २५ आॅगस्ट रोजी घेण्यात आले. या साहित्य संमेलनात मराठीत खऱ्या अर्थाने स्त्रीवादाची मांडणी करणाºया ताराबाईशिंदे यांच्या दीडशे वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महिला साहित्यावर दिवसभर विचार मंथन रंगले. एकूण सहा सत्रात पार पडलेल्या या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, या संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात तब्बल पाच महत्त्वपूर्ण ठरावही घेण्यात आले.
स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व प्रगती सार्वजनिक वाचनालय बुलडाणा यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन २०१९ घेण्यात आले. ताराबाई शिंदे यांच्या राजवाड्यापासून सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री व लेखीका नीरजा ह्या होत्या. यावेळी स्वागत्याध्यक्षा डॉ. प्रभाताई चिंचोले, नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद, बुलडाणा अर्बन परिवाराच्या अध्यक्षा कोमल झंवर, प्रगती वाचनालयाच्या अध्यक्षा अरुणा कुल्ली यांची प्रामुख उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचे व संमेलनाध्यक्ष नीरजा यांनी मार्गदर्शन केले. स्त्रीवादी विचारांच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे यांच्या शहरात हे साहित्य संमेलन असल्याने स्त्रीवादी लिखानावरही यावेळी चांगलीच चर्चा झाली. मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, सोयराबाई अशा संत कवयित्रींच्या साहित्यावरही या संमेलनातून प्रकाश टाकण्यात आला. संमेलनाच्या दुसºया सत्रात ‘आम्ही काय वाचतो, लिहीतो, बोलतो?’ हा विषय घेऊन टॉक शो घेण्यात आला. मुंबईच्या ज्योती आंबेकर आणि अमरावती येथील रजीया सुलताना या टॉक शोचे मुख्य आकर्षण होत्या.
त्यानंतर ताराबाई शिंदे यांच्या स्त्रीवादी विचार भारतीय साहित्यात सशक्तपणे का व्यक्त होत नाही? यावर तिसरे सत्र रंगले. तिसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे होत्या. चवथ्या सत्रामध्ये ‘पिंटी’ यावर एकपात्री प्रयोग अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील मुग्धा उमेश घेवरीकर या मुलीने उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेषकांची मने जिंकली. सायंकाळी सहा वाजता पाचव्या सत्रामध्ये साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी मराठी राज्यभाषा होण्यासाठी मराठी ब्लॉकलेखन यावर मोफत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच साहित्याच्या अनुषंगाने विविध प्रकारचे आठ ठरावही योवही घेण्यात आले. दिवसभर चाललेल्या वेगवेगळ्या सत्रातून महिला साहित्य, समाज जीवन, संस्कृती, परंपरा यावर प्रकाश टाकण्यात आला. (प्रतिनिधी)