लोणार तालुक्यात सरपंच पदासाठी चुरशीचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:35+5:302021-02-05T08:30:35+5:30
लोणार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहेे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीतील राजकीय ...
लोणार : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १० फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहेे. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतीतील राजकीय वातावरण तापले असून, सरपंचपदी कुणाची वर्णी लागते, याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडलेल्या १६ ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी जोरदार मार्चेबांधणी सुरू आहे. तालुक्यातील हिरडव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हिरडव ग्रामपंचायत सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सुटल्याने याठिकाणी राजकीय मोर्चेबांधणी करत समीकरणे जुळविणे सुरू झालेले आहे. हिरडव ग्रामपंचायत उपसरपंच तर कधी सदस्य राहिलेल्या भांदुर्गे परिवारातील इंदुबाई सुरेश भांदुर्गे, तसेच हिरडवचे राजकीय कुटुंब म्हणून ओळख असलेल्या डोईफोडे परिवारातील जयश्री विजय डोईफोडे यांच्यापैकी कोण सरपंच पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार, यावर चर्चा रंगत आहे. प्रस्तापितांना शह देत प्रथमच ग्रामपंचायत सदस्य झालेल्या साधना विजय पोफळे यांनीही सरपंच पदाच्या खुर्चीचा दावा करत मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र आहे. गोत्रा ग्रामपंचायत सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे; पण त्या प्रवर्गातील सदस्य निवडून आलेला नसल्याने सरपंच पद रिक्त राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. मेहकर व सिंदखेड राजा विधानसभा निवडणुकीच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या बिबी ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने येथील राजकारण चांगलेच तापलेले आहे.