नागरिकांना मास्क लावण्याचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:35 AM2021-04-01T04:35:05+5:302021-04-01T04:35:05+5:30
जानेफळ : नागरिकांना मास्क लावण्याचा विसर पडला आहे. बेजबाबदार नागरिकांपुढे प्रशासनाने हात टेकले असून दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरू केला ...
जानेफळ : नागरिकांना मास्क लावण्याचा विसर पडला आहे. बेजबाबदार नागरिकांपुढे प्रशासनाने हात टेकले असून दंडात्मक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांत १५३ नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी गावात येणाऱ्या नवीन व्यक्तींना गावाच्या वेशीवरच रोखून विलगीकरण केंद्रात पाठविले जात होते. त्यामुळे कोरोना रुग्णवाढीवर आळा बसला होता. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करून सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले होते. त्यामध्ये मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, हे नियम निश्चित केले गेले होते. कोरोनामुक्त जिल्हा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन अहोरात्र झटत आहे. परंतु, कोणत्याही नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये मेहकर तालुक्यातील रुग्णांचासुद्धा समावेश आहे. नवीन वर्षात कोरोनापासून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षा असताना मार्च महिन्यातसुद्धा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने मास्कचा वापर नियमित करा आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करून फिजिकल डिस्टन्सिंगचासुद्धा फज्जा उडविलेला आहे. यामुळे प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या कारवाईत ठाणेदार राहुल गोंधे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस प्रशांत असरडे व ग्रामपंचायत कर्मचारी श्रीराम इंगळे, छगन मोरे, गजानन दांडगे यांनी सहभाग नोंदविला.