जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 04:25 PM2020-02-02T16:25:35+5:302020-02-02T16:25:40+5:30

सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या धास्तीमुळे राज्यातील महानगर पालिका आणि नगर पालिकांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे

Citizens queue for birth and death certificates! | जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा!

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या रांगा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सुधारीत नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या धास्तीमुळे राज्यातील महानगर पालिका आणि नगर पालिकांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. वाढत्या अर्जसंख्येमुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांची अर्ज स्वीकारणे, नोंदी घेणे आणि प्रमाणपत्र देताना चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
केंद्र शासनाने ११ डिसेंबर रोजी सुधारीत नागरिकत्व कायदा लागू केला आहे. या कायद्या विरोधात देशभर आंदोलनाद्वारे विरोध होत आहे. तसेच राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी विरोधातही आगडोंब उठले आहे. थोडक्यात सीएए आणि एनआरसी बद्दल प्रचंड धास्ती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासाठी लागणारे दस्तवेज देण्यासाठी अनेकांची नकारात्मक भूमिका असतानाच, भारतीय नागरिक असल्याचा पुरावा आपल्याकडे असावा म्हणून जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती आणि जन्म-मृत्यू निबंधकांकडे अनेकांची धावाधाव सुरू आहे. दरम्यान, खामगाव नगर पालिकेतील अपुºया मनुष्यबळामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ सुरू असल्याचे दिसून येते. खामगाव पालिकेतील जन्म-मृत्यू विभागात विभाग प्रमुख राजेश मुळीक, लिपिक के.के. चिकणे, आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी चेतन सारसर हे तिघेच कार्यरत आहेत.


मुस्लिम समाजाच्या अर्जाचे प्रमाण जास्त!
एनआरसी, सीएएच्या गैरसमजातून आणि धास्तीमुळे जन्म-मृत्यू प्रमाणपत्र चुकीशिवाय तयार ठेवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. यामध्ये मुस्लीम समाजातील नागरिकांची संख्या मोठी आहे. खामगाव नगर पालिकेत गत दीड महिन्यात १० हजारावर अर्ज प्राप्त झाले आहेत. तर मलकापूर नगर पालिकेत अडीच हजार आणि नांदुरा नगर पालीकेत दीड हजारावर अर्ज प्राप्त झाल्याचे समजते. याबाबत सोशल माध्यमावरून माहिती दिली जात आहे. परिणामी, प्रमाणपत्र काढण्यासाठी मुस्लिम समाजबांधव गर्दी करीत आहेत.

खामगाव पालिकेच्या वेळेत बदल!
गत दीड महिन्यांत खामगाव पालिकेत तब्बल १० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वाढत्या अर्जाची संख्या लक्षात घेता खामगाव नगर पालिकेने जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या वेळेत बदल केला आहे. यामध्ये सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत नागरिकांना अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यानंतरचा ४ ते ६ वाजेपर्यंतचा वेळ जन्म मृत्यू विभागाने अंतर्गत नोंदी तपासण्यासाठी राखीव ठेवला आहे.

तारखांच्या घोळामुळे त्रास!
जन्म पुरावा असल्यास नोंद शोधणे सोयीस्कर होणे सोयीचे असते. मात्र, नगर पालिकेत दाखल होणाºया अर्जांमध्ये मोठ्याप्रमाणात तारखांचा घोळ असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नोंदी शोधताना जन्म-मृत्यू विभागातील कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागते.


मजुरी सोडून प्रमाणपत्रासाठी धावाधाव!
सीएए, एनआरसीबाबत माहितीची कमतरता, भीती यामुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिक आपली मजुरीसोडून प्रमाणपत्रासाठी धावाधाव करीत आहेत. त्यामुळे अनेक गरिबांना मोठ्या आर्थिक नुकसानालाही सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

गत दीड महिन्यांपासून प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढती आहे. यामध्ये मुस्लिम समाज बांधवांचे प्रमाण अधिक आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज निकाली काढण्यासाठी कार्यालयीन कामकाजात मुख्याधिकाºयांच्या आदेशाने बदल केला आहे. कुणालाही त्रास होणार याची खबरदारी घेत आहोत.
- राजेश मुळीक
जन्म-मृत्यू विभाग प्रमुख
नगर परिषद, खामगाव.

 

Web Title: Citizens queue for birth and death certificates!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.