मुलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी नागरिकांची पालिकेत धडक!
By अनिल गवई | Published: June 10, 2024 02:36 PM2024-06-10T14:36:50+5:302024-06-10T14:37:31+5:30
कामगार प्रमाणपत्रासाठी केली तीव्र निदर्शने
खामगाव: नगर पालिका क्षेत्रातील कामगारांना कामगार प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासोबतच घरकुल अधिकृत करावे, शंकर नगरातील नागरिकांच्या मुलभूत समस्या तात्काळ सोडविण्यासाठी शंकर नगरातील नागरिकांनी सोमवारी ११ वाजता पालिकेत धडक दिली.
निवेदनानुसार, परिसरातील विविध मुलभूत समस्यांकडे पालिका प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्या जात आहे. परिणामी याभागातील नागरिकांना नरकयातना सहन करावा लागत असून विविध समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र, या निवदेनाची दखल न घेतल्यामुळे शंकर नगरातील नागरिकांनी सोमवारी पालिकेत धडक देत संताप व्यक्त केला.
यावेळी मातृशक्तीने तीव्र निदर्शने केलीत. या मोर्चात अजय गवई, चंद्रकला उमाळे, जयराम बांगर, नयना गव्हांदे, संगिता लोखंडे, प्रियंका चौधरी, सिमा चौधरी, शेख तसलिम, संगिता तायडे, शारदा आसोडे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या. या निवेदनावर शंकर नगरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
आंदोलनाचा इशारा
मुलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी दुर्लक्ष केल्यास आंदोलकांनी यावेळी तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून दिला. कामगार प्रमाणपत्राकडे त्वरीत लक्ष देण्याची मागणी यावेळी संतप्त आंदोलकांसह मातृशक्तीने यावेळी लावून धरली. त्याचवेळी कर वसुलीत शिथिलता देण्याची मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.