दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:52+5:302021-04-03T04:30:52+5:30
बुलडाणा : शहरातील सुंदरखेड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले ...
बुलडाणा : शहरातील सुंदरखेड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, ही समस्या निकाली काढण्याची मागणी होत आहे.
-----
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जनजागृतीसाठी पुढाकार
मोताळा : कोविड लसीकरण जनजागृतीसाठी मोताळा तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. तालुक्यात शंभर टक्के लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
------
संघटन सचिवपदी वनिता गायकवाड
बुलडाणा : अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या संघटन सचिवपदी मलकापूर येथील वनिता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज निलपवार यांनी त्यांची नियुक्ती केली.
-----
अपात्र रेशनकार्ड मोहीम स्थगित
बुलडाणा : राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. रेशनकार्ड शोध मोहिमेला अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त दुकानदार संघटनेने विरोध दर्शवला होता.
---------
उशिरापर्यंत वाईन बार राहतात सुरू
सिंदखेड राजा : तालुक्यातील काही वाईन बारचालक कोरोना नियमांचे उल्लघंन करत आहेत. रात्री उशिरापर्यंत वाईन बार सुरू ठेवत आहेत. त्यामुळे परिसरात वाद विकोपाला जात आहेत. त्यामुळे संबंधित वाईन बार चालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-----
नाले आणि उकीरड्याची स्वच्छता
किनगाव जट्टू : येथील जिल्हा परिषद शाळा परिसरातील नाले आणि उकीरड्यांची स्वच्छता किनगाव जट्टू ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने गावातील स्वच्छतेवर भर दिला जात आहे.
----
श्रीराम सेनेची ऑनलाईन बैठक
बुलडाणा : श्रीराम सेनेचा पश्चिम विदर्भात विस्तार करण्याच्या अनुषंगाने श्रीराम सेनेच्या प्रवर्तकांची ऑनलाईन बैठक गुरूवारी घेण्यात आली. यावेळी श्रीराम सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल यांनी मार्गदर्शन केले.
-------
मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना सहआरोपी करा
बुलडाणा : वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांना सहआरोपी करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाच्या महिला शाखेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
---------
शिवजयंती साधेपणाने साजरी
बुलडाणा : येथील चिंतामणी नगरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. या कार्यक्रमाला रवी महाले, विनोद गावंडे, सचिन तायडे आदी उपस्थित होते.
--------
देवभक्ती एवढीच देशभक्तीही महत्त्वाची
मोताळा : देव जेवढा श्रेष्ठ आहे, तेवढाच देशही श्रेष्ठ आहे. त्यामुळे देवभक्ती एवढीच देशभक्ती श्रेष्ठ असल्याचे ह. भ. प. सीताराम गोंधने यांनी सांगितले. खरबडी येथे त्यांचा ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रम झाला.
-------
उन्हाचा प्रकोप वाढला
चिखली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असतानाच, गत तीन-चार दिवसांपासून प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करताना शहरवासीय दिसून येत आहेत.
---
जिल्ह्यातील पहिले डेमो हाऊस संग्रामपुरात
बुलडाणा : जिल्ह्यातील पहिले डेमो हाऊस संग्रामपूर तालुका पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात येणार आहे. या डेमो हाऊसच्या जागेचे सभापती रत्नप्रभा धर्माळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
---
भुईमुगाच्या पेऱ्यात वाढ
बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात यावर्षी भुईमुगाच्या पेऱ्यात वाढ झाली आहे. खामगाव तालुक्यात गतवर्षी २,७०० हेक्टर भुईमुगाचा पेरा होता. यावर्षी भुईमुगाचा पेरा साडेचार हजार हेक्टरवर पोहोचला आहे.
----------