शहर प्लास्टिकमुक्तीचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:23 AM2017-08-15T00:23:14+5:302017-08-15T00:24:54+5:30
लोणार: जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती उपक्रम स्वातंत्र्यदिनी करण्याचा निर्धार केला असून, शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे.
किशोर मापारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती उपक्रम स्वातंत्र्यदिनी करण्याचा निर्धार केला असून, शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर शहराला भेडसावणारा एक भेसूर चेहरा म्हणजे शहरात फोफावणारा प्लास्टिक कचरा आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील जवळपास सर्वच प्रकारच्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. रोज जमा होणार्या या लाखो प्लास्टिक पिशव्या कचर्यात जाऊन भटक्या प्राण्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. याबाबत लोणार नगर परिषदेने वेळोवेळी प्लास्टिक पिशवी बंदीबाबत पत्रे पाठवून माहिती दिली तसेच त्याबाबत पोस्टर्स लावले असले, तरी विक्रेत्यांच्या अंमलबजीवणीचा अभाव व ग्राहकांची मागणी व सोय पाहता विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवला असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. त्यामुळे फक्त भौतिक सुख-सोयी निर्माण होतील; पण शहराच्या सौंदर्याला व आरोग्याला धोकादायक ठरणार्या प्लास्टिकमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार व स्वच्छ भारत कसा होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कापडी पिशव्यांचा वापर अनिवार्य केला असताना त्या वापरासाठी कोणीही पाहिजे तितका धजावत नाही. जो तो प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य, वस्तू नेण्यालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला प्लास्टिक प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. प्लास्टिक पिशव्या अविघटनशील असल्यामुळे जनावरांच्या पोटात गेल्यास रवंथ प्रक्रियेत व पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पचनक्रियेचे आजार होतात. पिशव्या पोटातील अन्नाला चिटकून राहिल्याने अन्नाचे पचन होत नाही, अशा जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने प्लास्टिक पिशव्या वापराचे निकष व नियम ठरवून दिले आहेत. तरीही शहरातील हातगाड्या व दुकानांमध्ये ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत आहे.
कायदा फक्त नावापुरता?
पर्यावरणाला धोका असल्याने शासनाने कॅरिबॅग वापरावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यासाठी कायदाही केला; पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. प्लास्टिक कॅरिबॅगमुळे आरोग्याला धोका, पावसाळ्यात तुंबणारी गटारे यांची नेहमी चर्चा असते; पण यासाठीचा कायदा करण्यापलीकडे शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. लाल, पिवळ्या व काळ्या रंगातील प्लास्टिक कॅरिबॅग विक्री व्यवसाय शहरामध्ये चांगलाच फोफावला आहे.
कापडी पिशव्यांचा अपूर्ण पुरवठा
ग्राहकांना वस्तू विक्री केल्यास कॅरिबॅग द्यावीच लागते. त्याला पर्याय म्हणून कागदी अथवा कापडी पिशव्यांचा बाजारपेठेत अपूर्ण पुरवठा असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे भाजीविक्रेता, फळविक्रेता यांच्याकडून सर्रास प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर होताना दिसतो.
यूज अँण्ड थ्रोची क्रेझ
कौटुंबिक सोहळ्यातही यूज अँण्ड थ्रो म्हणून येणार्या प्लास्टिकचे ग्लास, कप, वाटी, ताट, चमचे याचा वापर वाढला आहे. त्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आरोग्यासाठी हानिकारक असून, ते कर्करोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरणारे असते.