मासिक सभेतील उपस्थितीवरून उपसरपंच, सरपंच पित्यात हाणामारी
By संदीप वानखेडे | Published: September 28, 2022 06:30 PM2022-09-28T18:30:43+5:302022-09-28T18:31:20+5:30
उपसरपंचाचा पाडला दात तर सरपंच पित्याला घेतला चावा: परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
डोणगाव (बुलढाणा): ग्रामपंचायत मासिक सभेत उपस्थित राहण्यावरून डाेणगाव येथून जवळच असलेल्या वरुड येथे उपसरपंच आणि सरपंचाच्या पित्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली़ एवढेच नव्हे तर सरपंच पित्याने उपसरपंचाचा दात पाडला़ यावेळी उपसरपंचाने सरपंच पित्याला चावा घेतला़ त्यानंतर दाेन्ही गटात हाणामारी झाली़ ही घटना २७ सप्टेंबर राेजी घडली़ या प्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी परस्परविराेधी तक्रारीवरून दाेन्ही गटाच्या ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्राम वरुड येथील ग्रामपंचायत कार्यालयात २७ सप्टेंबर राेजी मासिक सभा सुरू हाेती़ त्यात सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच बसलेले असताना उपसरपंच कुंडलिक भिका राठोड यांनी सरपंचांचे वडील महादेव माणिकराव वानखेडे यांना ग्रामपंचायतमध्ये येण्यास मज्जाव केला़ त्यामुळे वानखेडे यांनी कुंडलिक राठोड यांना मारहाण केली़ यामध्ये राठाेड यांचा एक दात पडला तर डाव्या हाताच्या खांद्यावर चावा घेतला व त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी राठाेड यांच्या फिर्यादीवरून अतुल वानखेडे, गोपाल वानखेडे, महादेव वानखेडे, जगदीश पवार, श्रीचंद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरपंचांचे वडील महादेव वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामपंचायतमधील मासिक मिटिंग संपल्यानंतर त्यांचा मुलगा हा ग्रामपंचायतमध्ये हजर हाेता़ त्यावेळी महादेव वानखेडे हे पोखरा समितीचे कृषि सहायक व समूह सहायक यांच्या सोबत ग्रामपंचायतमध्ये आले असता कुंडलिक राठोड उपसरपंच हे दारू पिऊन ग्रामपंचायतमध्ये बसलेले होते़ तेव्हा त्यांनी आमची मिटिंग सुरू आहे, आत येऊ नका असे सांगून ग्रामपंचायतमध्ये येण्यास मज्जाव केला़ त्यावेळी सरपंच मुलाने आत येऊ द्या, असे सांगितले़ त्यामुळे दाेन्ही गटात वाद झाला़ या वादात कुंडलिक राठोड याने महादेव वानखेडे यांना चावा घेतला़ तसेच इतरांनी त्यांच्या मुलाला लाेटपाेट केली, असे फिर्यादीत म्हटले आहे़ महादेव वानखेडे यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक राठोड, दिलीप राठोड, तुकाराम पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.