प्रेम प्रकरणातून दोन युवकांमध्ये वाद; देशी कट्टा व जीवंत काडतुसासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:34 PM2019-09-07T13:34:17+5:302019-09-07T13:34:25+5:30
देशी कट्टा व जीवंत काडतूसासह आरोपी गणेश तल्लारे यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा : प्रेम प्रकरणातून दोन युवकांमध्ये सुरु असलेली हाणामारी सोडविण्यासह गेलेल्या पोलिसांना एका युवकाजवळ देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस आढळून आल्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री शहरातील भिलवाडा परिसरात उघडकीस आला. दरम्यान या प्रकरणी मूळचा भूसावळ येथील राहणारा व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरात वास्तव्यास असलेल्या गणेश लक्ष्मीनारायण तल्लारे (२७) यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान एकाच युवतीवर दोघांचे प्रेम असल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे. मूळचा भुसावळ येथील व तीन वर्षांपासून बुलडाणा शहरातील संभाजी भगाात राहणारा गणेश तल्लारे हा जुनागाव भिलवाडा भागातील आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तिथे तिचा पूर्वीचा प्रियकर सुभाष कुटे (रा. बोराखेडी ता. मोताळा ) हजर होता. प्रियसीला भेटण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादातून सुभाष कुटे याने गणेश तल्लारेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोघांमधील हाणामारी चांगलीच वाढल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच डीबी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता गणेश तल्लारे याच्या खिशात देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस आढळून आले. देशी कट्टा व जीवंत काडतूसासह आरोपी गणेश तल्लारे यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुध्द आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनित घाटोळ, माधव पेटकर, प्रशांत मोरे यांच्यासह डीबी पथकाच्या कर्मचाºयांनी कारवाईत सहभाग घेतला.