बुलडाणा जिल्ह्यात ३.७० लाख लोकांमागे एक ‘क्लास वन’ डॉक्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:51 PM2019-12-03T14:51:56+5:302019-12-03T14:52:09+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये १३ वैद्यकीय अधिक्षकांसह ५० विशेषतज्ञांची आवश्यकता आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेमध्ये ‘क्लास वन’ डॉक्टरांचा मोठा अभाव असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. लोकसंख्येचा विचार करता जिल्ह्यातील ३ लाख ७० हजार लोकांमागे केवळ एक ‘क्लास वन’ डॉक्टर कार्यरत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमध्ये १३ वैद्यकीय अधिक्षकांसह ५० विशेषतज्ञांची आवश्यकता आहे.
आजही गोरगरीब रुग्णांची धाव जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयामध्येच आहे. परंतू शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टरांची वाणवा ही नित्याचीच झालेली आहे. विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिक्षक, वर्ग एक दर्जाचे वैद्यकीय अधिकारी सरकारी रुग्णालयांमध्ये सापडणे मोठे अवघड आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्याची वाट पकडावी लागते. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाख ८६ हजार २५८ आहे. त्यामध्ये शहरी भागाची ५ लाख ४८ हजार ८६० व ग्रामीण भागाची लोकसंख्या २० लाख ३७ हजार ३९८ आहे. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी वर्ग एक दर्जाच्या केवळ सात डॉक्टरांवर आहे. तालुकाभरातील लोक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात जातात. परंतू जिल्ह्यातील १२ पैकी ११ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारीच नाही. मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आहेत, परंतू ते सुद्धा रजेवर आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा, उप जिल्हा रुग्णालय खामगाव, शेगाव व मलकापूर येथेही वर्ग एक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा अभाव आहे.
दोन वर्षापासून ६३ पदे रिक्त
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ७० क्लास वन डॉक्टरांचे पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ सात पदे भरलेले असून, ६३ पदे रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षापासून रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात २० पदांऐवजी पाच भरलेले आहेत. स्त्री रुग्णालयात पाचही पदे रिक्त आहेत. उप जिल्हा रुग्णालय खामगाव येथे १६ पदांपैकी केवळ एक पद भरण्यात आलेले आहे. शेगाव व मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातही हीच परिस्थिती आहे.
ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये क्लास वनची सात पदे भरलेली आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. वर्ग दोनची पदे भरलेली आहेत. रिक्त पदे असतानाही चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न असतो.
- प्रेमचंद पंडीत, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा.