बुलडाणा जिल्ह्यातील १६० शाळांतील वर्ग खोल्या धोकादायक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 06:02 PM2018-07-17T18:02:31+5:302018-07-17T18:03:01+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील तब्बल ११ टक्के शाळांमधील वर्ग खोल्या शिकस्त झाल्या असून या वर्ग खोल्याुंळे विद्यार्थ्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्ह्यातील तब्बल ११ टक्के शाळांमधील वर्ग खोल्या शिकस्त झाल्या असून या वर्ग खोल्याुंळे विद्यार्थ्यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वर्ग खोल्या पाडून त्या नव्याने उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी मेहकर तालुक्यातील मोळी येथील शाळेची खोली ढासळल्याची घटना उजागर झाल्यानंतर जिल्ह्यातील धोकादायक शाळा तथा वर्ग खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी नगर जिल्ह्यात निंबोडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळून त्यात तीन मुले ठार झाली होती तर १६ जण जखमी झाल्याची घटना २८ आॅगस्ट २०१७ रोजी घडली होती. त्यानंतर लातूर, औरंगाबादमध्येही वर्ग खोल्या कोसळण्याचे प्रकार समोर आले होते. त्यातच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मोळी येथील जिल्ह परिषद शाळेची ६० वर्षे जुनी वर्ग खोली १४ जुलै रोजी पहाटे शाळा भरण्याच्या पूर्वी ढासळली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा आढावा घेतला असता १४४२ शाळांपैकी तब्बल १६० शाळांमधील ३५८ वर्ग खोल्या या शिकस्त झाल्या असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अहवालातच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या वर्ग खोल्यावेळत पाडून नव्याने वर्ग खोल्या न उभारल्या गेल्यास विद्यार्थ्यांच्या जिवित्वासीच एक प्रकारे खेळ खेळण्याचा प्रकार होऊ शकतो. वास्तविक काही शिकस्त झालेल्या वर्ग खोल्या या शाळांनी वापरणे बंद केले आहे. त्यामुळे तसा मोठा धोका या वर्ग खोल्यांचा नसला तरी शाळेतील मुले खेळता खेळता या वर्ग खोल्यांजवळ गेली आणि दुर्देवी घटना घडली तर त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यात ६८, चिखली तालुक्यात २१, खामगाव तालुक्यात ५८, मोताळा तालुक्यात २८, लोणार २५, मेहकर ३३, जळगाव जामोद ३८, नांदुरा ८, संग्रामपूर ३२, शेगाव २५, सिंदखेड राजा २०, देऊळगाव राजा दोन याप्रमाणे वर्ग खोल्या शिकस्त झाल्या आहेत. मलकापूर तालुक्याची माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, शिकस्त झालेल्या या वर्ग खोल्यांचे आर्युमान हे १०० ते ६० वर्षे जुने आहे. त्यामुळे या शाळांमधील उपरोक्त वर्ग खोल्या ह्या शिकस्त असून त्या कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वर्ग खोल्या पाडण्यास परवानगी
३५८ वर्ग खोल्यांपैकी १७५ वर्ग खोल्या पाडण्यास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने मध्यंतरी परवानगी दिली आहे. दरम्यान, वर्ग खोल्या उभारण्यासंदर्भात मात्र तुर्तास कोणतीही हालचाल नसल्याचे शिक्षण विभागाच्या यासंदर्भातील अहवालावरून स्पष्ट होत आहे. मलकापूर, नांदुरा, लोणार, मेहकर, शेगाव, नांदुरा, खामगाव, जळगाव जामोद, मोताळा, मलकापूर तालुक्यााली ७७ शाळांमधील १७५ वर्ग खोल्या येत्या काळात पाडण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी त्यासंदर्भात परवानगी दिली आहे.
बजेटमध्ये कपात
सर्व शिक्षा अभियानाच्या बजेटमध्येच केंद्र सरकारने कपात केली आहे. गेल्या तीन वर्षापासून हा कित्ता सुरू आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिकस्त शाळांच्या दुरुस्ती तथा नवीन वर्ग खोल्या निर्मितीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने गेल्यावर्षी प्रस्ताव पाठवला होता. या वर्षीही डिसेंबर महिन्यात सर्व शिक्षा अभियानाच्या बजेटमध्ये त्याबाबत अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.