बहुतांश ठिकाणी स्पष्ट बहुमत तर काही ठिकाणी संमिश्र स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:36 AM2021-01-19T04:36:06+5:302021-01-19T04:36:06+5:30
देऊळगाव राजा : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. जाहीर झालेल्या निकालात बहुतांश ठिकाणी मतदारांनी स्पष्ट बहुमताचा ...
देऊळगाव राजा : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. जाहीर झालेल्या निकालात बहुतांश ठिकाणी मतदारांनी स्पष्ट बहुमताचा कौल दिला तर, काही ग्रामपंचायतमध्ये संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही येथे १७ सदस्यांसाठी निवडणूक झाली. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान पठाण यांच्या विरोधात गावपातळीवर दिग्गज पुढारी एकत्रित होऊन ग्रामविकास पॅनेलने आव्हान उभे केले होते. रियाजखान पठाण यांच्या हातातून ग्रामपंचायतची सत्ता हिसकावून घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी विरोधकांनी केली होती. दुसरीकडे पठाण गटानेही कंबर कसत विरोधकांचे आव्हान पलटविण्याची रणनीती आखली होती. त्यातच ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांची झालेली प्रचारसभा पठाण गटासाठी फायदेशीर ठरली. १७ पैकी तब्बल ११ जागा जिंकून रियाजखान पठाण यांनी वर्चस्व कायम राखले. स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तालुक्यातील दुसरी मोठी ग्रामपंचायत अंढेरा असून सदस्य संख्या १३ इतकी आहे. या ठिकाणी मतदारांनी स्पष्ट बहुमताचा कौल कुणाच्याही पारड्यात न टाकल्याने संमिश्र स्थिती उद्भवली आहे. याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी सात सदस्यांची गरज असून, तो आकडा जुळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज कायंदे यांनी उंबरखेड ग्रामपंचायतमध्ये सत्ता कायम राखत वर्चस्व सिद्ध केले आहे. पंचायत समितीच्या सभापती रेणुका बुरकुल यांनी चिंचोली बामखेड ग्रामपंचायतमध्ये एकहाती बाजी मारली आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती रजनी राजू चित्ते यांनी सर्व सातही जागांवर विजय मिळवीत वर्चस्व निर्माण केले आहे. सावखेड भोई ग्रामपंचायतमध्ये पंचायत समितीचे उपसभापती हरीश शेटे यांनी स्पष्ट बहुमत मिळविले आहे. निवडणूक निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायतमध्ये गिरोली खुर्द, तुळजापूर, पळसखेड झाल्टा, निमगाव गुरु, पांगरी-वाडी, खल्याळ गव्हाण, देऊळगाव मही, डोढरा, टाकरखेड वायाळ, बायगाव बुद्रुक, मेंडगाव, पिंप्री आंधळे, सावखेड भोई, जवळखेड, उंबरखेड, चिंचोली बुरकुल, मेहुणा राजा, बोराखेडी बावरा, शिवनी आरमाळ, आळंद, अंढेरा, सावखेड नागरे, मंडपगाव या २३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २६ ग्रामपंचायतीमधून ६२ उमेदवार अविरोध निवडून आले. त्याचबरोबर नागणगाव, पाडळी शिंदे आणि पिंपळगाव बुद्रुक या तीन ग्रामपंचायतची निवडणूक अविरोध झाली होती.