चिखली शहराच्या हद्दवाढीचा मार्ग मोकळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:28 AM2020-12-25T04:28:12+5:302020-12-25T04:28:12+5:30
चिखली : गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा व प्रस्तावातील त्रुटींमुळे रेंगाळलेल्या चिखली शहर हद्दवाढीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, चिखली ...
चिखली : गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा व प्रस्तावातील त्रुटींमुळे रेंगाळलेल्या चिखली शहर हद्दवाढीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, चिखली नगर परिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावातील सर्व अडथळे आमदार श्वेता महाले यांच्या प्रयत्नाने दूर झाले आहेत. त्यामुळे नगरपालिका हद्दवाढीस लवकरच मान्यता मिळणार आहे.
चिखली नगर परिषद हद्दवाढीसंदर्भाने २२ डिसेंबर रोजी नगरविकास प्रधान सचिवांना पत्रसुद्धा दिले आहे. या पत्रात चिखली नगर परिषदेची विद्यमान हद्द दिनांक १० सप्टेंबर १९८७ ला मंजूर झाली असून, नगर परिषदेचे क्षेत्रफळ ७.८८९ चौ.कि.मी. आहे. तसेच सन १९८१ च्या जनगणनेनुसार चिखली शहराची लोकसंख्या २७ हजार ६०६ होती. तेव्हापासून चिखली शहराची हद्दवाढ झालेली नाही. दरम्यान, सन २०११ रोजी झालेल्या जनगणनेनुसार चिखली शहराची लोकसंख्या ५७ हजार ८८९ एवढी आहे. तसेच नगर परिषद चिखली हद्दीबाहेर झपाट्याने विस्तार होत असून निवासी व वाणिज्य क्षेत्र निर्माण होत आहे. चिखली शहराच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून व वाढीव क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता चिखली नगर परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्यामार्फत २२ ऑगस्ट २०१९ रोजी हद्दवाढीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला; मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने हा प्रस्ताव रेंगाळेलेला होता. दरम्यान, या प्रकरणी आमदार श्वेता महाले यांनी १० मार्च २०२० रोजी ना. एकनाथजी शिंदे, नगरविकास मंत्री तथा प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हद्दीवाढीच्या प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी केली होती, तसेच ८ सप्टेंबर २०२० रोजी पत्र दिले होते. तथापि सातत्याने पाठपुरावादेखील चालविला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, प्रस्तावाबाबत कार्यासन अधिकारी, नगरविकास यांनी ११ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या पत्रानुसार चिखली नगर परिषदेच्या वतीने त्रुटींची पूर्तता केलेली आहे. तसेच आ. श्वेता महाले यांनी याबाबत विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न व कपात सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधलेले आहे. तसेच चिखली नगर परिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावास तातडीने मान्यता देण्याची मागणी आ. महाले यांनी प्रधान सचिवांकडे केलेली आहे.