कर्जमाफीची लिंक बंद; शेतकरी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:39 AM2017-09-13T00:39:18+5:302017-09-13T00:39:18+5:30
ऑनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे मोताळा शहरात शेतकर्यांना रात्रभर जागरण करावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्जमाफीसाठी सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकर्यांनी १ एप्रिल २00९ ते ३0 जून २0१६ पर्यत कर्ज घेतले आहे. अशा शेतकर्यांना कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरून द्यायचे आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी पती-पत्नी दोघाच्या अंगठय़ाचे ठसे द्यावे लागतात. त्यानंतर संबंधित अर्ज वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड होतो; परंतु वेबसाइड दिवसा मोठय़ा प्रमाणात बंद असते. त्यामुळे शेतकरी रात्री ई - सेवा केंद्रापुढे गर्दी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/मोताळा: ऑनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा सर्व्हर डाउन राहत असल्यामुळे मोताळा शहरात शेतकर्यांना रात्रभर जागरण करावे लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्जमाफीसाठी सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकर्यांनी १ एप्रिल २00९ ते ३0 जून २0१६ पर्यत कर्ज घेतले आहे. अशा शेतकर्यांना कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरून द्यायचे आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी पती-पत्नी दोघाच्या अंगठय़ाचे ठसे द्यावे लागतात. त्यानंतर संबंधित अर्ज वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड होतो; परंतु वेबसाइड दिवसा मोठय़ा प्रमाणात बंद असते. त्यामुळे शेतकरी रात्री ई - सेवा केंद्रापुढे गर्दी करीत आहेत.
यामुळे कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी पूर्ण रात्र जागरण करून काढावी लागत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी दिवसा शेतात काम करून थकलेला शेतकरी आता अर्ज भरण्यासाठी रात्र जागून काढत आहे. हे अर्ज भरण्यासाठी वयोवृद्ध शेतकर्यांना रात्रभर जागत काढावी लागत आहे. ज्या शेतकर्यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे, असे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत.
कर्जमाफीचे अर्ज त्वरित भरा - जिल्हाधिकारी
४राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत शेतकर्यांना कर्जमाफी दिली आहे. या योजनेनुसार १५ सप्टेंबर २0१७ पर्यंत कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरण्याची मुदत आहे. तरी ज्या शेतकर्यांनी अर्ज भरलेले नसतील, अशा शेतकर्यांनी त्वरित ग्रा.पं. आपले सरकार सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र, सीएससी केंद्रांच्या माध्यमातून अर्ज भरून घ्यावे. मुदत संपत असल्याने उर्वरित शेतकर्यांनी अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. जिल्ह्यात १२१0 केंद्रांवर बायोमेट्रिक यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. या केंद्रांवरून विनाशुल्क शेतकर्यांचे अर्ज भरून घेण्यात येत आहे. शेतकर्यांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता अर्ज भरून घ्यावेत. तसेच शेतकर्यांनी कर्जमाफीमध्ये आपले नाव ऑनलाइन पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट देऊन नावाची खात्री करून घ्यावी. जर नाव नसेल तर पुन्हा अर्ज भरून घ्यावा, असेही जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
दिवसा अर्ज, रात्री बोलावणे
बुलडाणासह अन्य शहरांमध्ये शेतकर्यांकडून कर्जमाफीचे अर्ज दिवसा स्वीकारण्यात येत आहे; मात्र दिवसा लिंक बंद असल्यामुळे अर्ज भरणे शक्य होत नाही. त्यामुळे सदर शे तकर्यांना रात्री पुन्हा बोलाविण्यात येते.
अनेक शेतकरी गावात कर्जमाफीचे अर्ज भरल्या जात नसल्यामुळे शहरात येत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.
भारनियमनाचा शेतकर्यांना फटका
सध्या जिल्हय़ात कर्जमाफीचे अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे; मात्र यादरम्यान भारनियमन करण्यात येत असल्यामुळे शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. तसेच भारनियमनामुळे सिंचनालाही फटका बसत आहे. वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठय़ात अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. तसेच जिल्हय़ातही ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात भारनियमन करण्यात येत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागात ई-महा सेवा केंद्र भारनियमनामुळे बंद पडले असल्याने शेतकर्यांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळविला आहे; मात्र शहरातही तासन्तास विद्युत पुरवठा खंडित असल्याने शेतकर्यांना ताटळत बसावे लागले. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे; मात्र भारनियमनामुळे शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही.
अनेक शेतकरी ताटकळले!
१५ सप्टेंबर कर्जमाफीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यातील शेतकरी अर्ज भरण्यासाठी ई-सेवा केंद्रांवर गर्दी करीत आहे. परिणामी लिंक बंद पडली आहे. बुलडाणा जिल्हय़ात सर्वच तालुक्यात मंगळवारी लिंक बंद होती. शेतकरी गावातील केंद्रांवर लिंक बंद असल्यामुळे शहरातील महा ई-सेवा केंद्रांवर अर्ज भरण्यासाठी आले; मात्र येथेही गर्दी असल्यामुळे त्यांना दिवसभर ताटकळत बसावे लागले. बुलडाणा शहरातील सर्वच ई-सेवा केंद्रांवर शेतकर्यांनी गर्दी केली होती. अखेरीस सायंकाळपर्यंत लिंक सुरू झाली नसल्याने शेतकर्यांना अर्ज न भरताच घरी परत जावे लागले.
गत दोन दिवसांपासून गावातील महा ई-सेवा केंद्रांवरील लिंक बंद आहे. त्यामुळे बुलडाणा येथील ई-सेवा केंद्रांवर आलो; मात्र येथेही लिंक बंदच आहे. सकाळपासून तर सायंकाळ पर्यंत येथे बसून आहे; मात्र लिंक सुरू झाली नाही.
- दिलीप नप्ते
शेतकरी चौथा, ता. बुलडाणा