संग्रामपूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; नदी नाल्यांना पूर, घरांमध्ये पाणी घुसले, शेती नुकसान
By सदानंद सिरसाट | Published: July 22, 2023 11:40 AM2023-07-22T11:40:50+5:302023-07-22T11:41:10+5:30
असंख्य गावातील घरांमध्ये पाणी घुसले
संग्रामपूर (बुलढाणा) : शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने संग्रामपूर तालुक्यात हाहाकार माजविला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. तालुक्यातील असंख्य गावातील नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी सूरक्षित आश्रय घेतला. रस्ते जलमय झाले. पावसामूळे विजपूरवठा खंडीत झाला आहे.
संग्रामपूर तालुक्यातील बावनबिर, टूनकी, आलेवाडी, सोनाळा, एकलारा बानोदा, लाडणापूर, रुधाना, पंचाळा, उमरा, वडगाव वान, वानखेड आदी गावांमध्ये नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. पूरामूळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बावनबिर येथील केदार नदी, आलेवाडी, टूनकी येथील नदी, सोनाळा येथील कचेरी नदी, लेंडी नाल्याला प्रचंड पूर आला असून दुथडी भरून वाहू लागले आहे.
नदी नाल्यांचा पाणी शेतात घुसल्याने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट आले आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने संग्रामपूर तालुक्यातील असंख्य गावातील घरांचे नुकसान झाले. प्रचंड पाऊस पडल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले. त्यांना आर्थिक बळ देण्याची नितांत गरज आहे.
प्रचंड पाऊस पडत असल्याने तालुक्यातील असंख्य गावांमध्ये नदी नाल्यांचे पाणी घुसले आहे. जीवित हानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य सुरू आहे.- योगेश्वर टोंपे (तहसीलदार संग्रामपूर)