निवडणूक कार्यातून बचावासाठी क्लृप्त्या
By admin | Published: October 2, 2014 11:43 PM2014-10-02T23:43:12+5:302014-10-02T23:43:12+5:30
बुलडाणा जिल्हा प्रशासन करणार कारवाई.
बुलडाणा : निवडणुकीच्या कामापासून दूर राहण्यासाठी काही कर्मचार्यांनी मात्र नवनवीन क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रातील ९ अधिकारी व २२ कर्मचार्यांनी त्यांना मधुमेह तसेच रक्तदाबाचा आजार असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांचे प्रमाणपत्र सादर केले आहे. या प्रकाराची चौकशी लवकरच केली जाईल. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन व विधानसभा परिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी डोळ्यांत तेल घालून काम करीत आहेत. प्र त्येक विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता पथक, तसेच विविध भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये महसूल प्रशासन, पोलिस विभाग, अप्पर वर्धा, पाटबंधारे विभाग व अन्य विभागातील अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामातून सुटका व्हावी म्हणून अनेकांनी विविध क्लृप्त्या लढविल्या आहेत. यासाठी आजार असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले आहे. या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. प्रमाणपत्र बनावट आढळल्यास कर्मचार्यांवर थेट निलंबनाची कारवाई होणार आहे. त्यामुळे काही अधिकार्यांचे धाबे दणाणले असून कारवाईचा धाक निर्माण झाला आहे.