सीएम साहेब, माॅ जिजाऊंच्या नगरीची एकदा पाहणी कराच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:04 AM2021-02-06T05:04:47+5:302021-02-06T05:04:47+5:30
मुकुंद पाठक सिंदखेड राजा: शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीच्या विकासासाठी काहीच कमी पडू देऊ ...
मुकुंद पाठक
सिंदखेड राजा: शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीच्या विकासासाठी काहीच कमी पडू देऊ नका, असे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिले होते; मात्र त्यांचा हा शब्द फारसा पाळल्या गेलेला नाही. माॅ जिजाऊंचं सिंदखेड आजही सर्वांगीण विकासाच्या प्रतीक्षेत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी लोणार सरोवर संवर्धन व विकासाच्या मुद्द्यावर लोणारात आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्यांनी हवाई सफरीत सिंदखेड राजा नगरीकडे कानाडोळा करून चालणार नाही. हे छत्रपतींचे स्वराज्य आहे तर माॅ जिजाऊ या स्वराज्याची प्रेरणा आहेत, हे राज्य सरकारला आणि त्यातही शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना विसरता येणार नाही.
विकास वाटा खुल्या करा!
मातृतीर्थ म्हटलं की, प्रेरणा मिळते ती माॅ जिजाऊंच्या विचारांची. राष्ट्रमातेने खंबीर राजा घडविला. त्या राजाच्या आधुनिक राज्यात माॅ जिजाऊंचं सिंदखेड विकासापासून कोसो दूर आहे. नाही म्हणायला मध्यंतरी सिंदखेड राजा विकासासाठी ३११ कोटींचा विकास आराखडा तयार झाला; पण आम्ही केवळ त्या आकड्यांच्या आठवणी काढून कुंठत बसलो आहोत. माॅ जिजाऊंचं नाव घेतल्यानंतर शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी आमदार, मंत्री वेटींगला ठेवून सिंदखेड राजाच्या नगराध्यक्षांना भेटीस बोलावले होते. अशा माॅ जिजाऊंच्या जन्मगावाचा विकास प्राधान्याने होण्याची गरज आहे.
कोट
आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत आम्ही शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलो होतो. माॅ जिजाऊंच्या गावाहून आलो म्हटल्यावर बाळासाहेबांनी आम्हाला लगेच बोलावले. हा माॅ जिजाऊंच्या नावाने झालेला आमचा सन्मान होता. त्याच जिजाऊ नगरीचा विकास खुंटला आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी अधिक गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे.
(देवीदास ठाकरे,
माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नेते)
कोट
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या प्रेरक नगरीच्या विकासाला चालना द्यावी. आम्ही काँग्रेस म्हणून आमच्या राज्यस्तरीय नेत्यांकडे विकासासाठी पाठपुरावा करू. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मातृतीर्थ सिंदखेड राजाचा विकास आता साध्य करून घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकवेळ सिंदखेड राजा येथे भेट द्यावी, ही अपेक्षा.
जगन ठाकरे
काँग्रेस, नगरसेवक.
(फोटो :
86181 : देवीदास ठाकरे
133813: एड नाझेर काजी 276538 : जगन ठाकरे)