बच्चू कडूंची भूमिका योग्य; उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी- शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 07:23 PM2020-02-08T19:23:32+5:302020-02-08T19:23:46+5:30
अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
बुलडाणा: महाविकासआघाडी सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला देणा-या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांमध्ये जाऊन ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे. सोबतच अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
दुस-या टप्प्यातील स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक बुलडाणा येथे आठ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी उपरोक्त टोला लगावला. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आळंदी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर टीका करत भाष्य केले होते. त्याला सत्तारांनी उत्तर देत राज्यमंत्री कडू यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेत असताना माजी खा. राजू शेट्टी यांनी उपरोक्त विधान केले.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य आहे. घोषित कर्जमाफी योजनेत केवळ १५ ते २० टक्के शेतक-यांचा लाभ होत असून सप्टेंबर २०१९ नंतरचे शेतकरी त्यास पात्र नाहीत. वास्तविक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. चालू हंगामात शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज हे जूनमध्ये थकित होईल. आपत्तीमुळे शेतक-यांचे पीकच अस्तित्वात नाही. त्यामुळे या शेतक-यांची कर्जमाफी झाल्यास त्यांना दिलासा मिळले. पीक कर्ज एक वर्षासाठी सहा टक्के सवलतीच्या दरात मिळते. त्यानंतर त्यावर १२ टक्के व्याज लागते. त्यामुळे मुद्दलापेक्षा शेतक-यांचे व्याज अधिक होत असल्याने शेतक-यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांची भूमिका योग्य असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचे सांगितले होते. नंतर राज्यावर कर्ज असल्यामुळे दोन टप्प्यात कर्जमाफी करणार असल्याचे सांगितले. मर्यादीत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ होत आहे त्यामळे शेतकरी कसा कर्जमुक्त होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या योजनेत बदल करून सरकार सरसगट शेतक-यांना कर्जमुक्त करणार आहे, असे जाहीर करावे, असे ते म्हणाले.
आमचे ‘तण नाशक’ ऑपरेशन
भाजप राज्यात ऑपरेशन ‘लोटस्’ सुरू करणार असल्याबाबत त्यांना छेडले असता गत वर्षभरापासून आमचे ऑपरेशन ‘तण नाशक’ सुरू आहे. त्याचा परिणाम झालेला आहे मिश्कीलपणे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा हा भाजपासारख्या सांप्रदायिक पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही दिला आहे. याचा अर्थ शेतकरी हिताला बाधा पोहोचल्यानंतरही आम्ही गप्प बसावे असा नसून शेतकरी हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले.