थंडीचा पिकांना फटका : एका दिवसात ‘हिरवे रान झाले पिवळे!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 04:30 PM2018-12-30T16:30:16+5:302018-12-30T17:02:13+5:30
मका व हळद या दोन्ही पिकांना उष्ण व दमट हवामान चांगले मानवते; मात्र जिल्ह्यातील हवामानाचा पारा अत्यंत खाली घसरल्याने शेतातील उभी झाडे वाळली आहेत.
बुलडाणा: मका व हळद पिकाने हिरवा शालू पांघरुन नटलेले असे हिरवेकच्च रानं एका दिवसात पिवळे पडल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश भागात पाहवयास मिळत आहे. मका व हळद या दोन्ही पिकांना उष्ण व दमट हवामान चांगले मानवते; मात्र जिल्ह्यातील हवामानाचा पारा अत्यंत खाली घसरल्याने शेतातील उभी झाडे वाळली आहेत. वाढत्या थंडीचा मका, हळद व इतर काही पिकांना फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
जिल्ह्यातील शेतकरी रब्बी हंगामातील मका पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. त्यापाठोपाठ हळदीचे उत्पादन घेण्याकडेही शेतकºयांचा कल वाढला आहे. मात्र या पिकांना लागणारे पोषक हवामान असले तर ही दोन्ही पीके शेतकºयांना भरघोस उत्पन्न देऊन जातात. थंडी बहुतांश पिकांना पोषक ठरते. मात्र सध्या थंडी अतिप्रमाणात असल्याने बºयाच पिकांना याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. हळद व मका पीक अचानक वाळल्याचे प्रकार समोर आले आहेत. मका हे पीक उष्ण हवामानात वाढणारे असून वाढीच्या काळात उबदार दिवस आणि रात्रीचे तापमान पिकास मानवते, कडक थंडीपासून मुक्त असा १४० दिवसांचा काळ या पिकास आवश्यक असतो. मका उगवणीसाठी १८ अंश सें.ग्रे. तापमान योग्य असून त्यापेक्षा कमी तापमान असल्यास उगवणीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे सुर्य - प्रकाशाचा कमी अधिक परिणाम मका या पिकाच्या वाढीवर होतो. हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढही उत्तम होते. पाण्याचा ताण व जास्त पाऊससमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते. परंतू कडक हिवाळा या पिकास मानवत नाही. सरासरी ५०० ते ७५० मिलीमीटर असणाºया निमशुष्क वातावरणात हळदीचे पीक चांगले येते. थंडीमुळे हळदीची पानेवाढ काही अंशी थांबते व जमिनीतील कंदांची (फण्यांची) वाढ होते. कोरडे व थंड हवामान कंद पोषणास अनुकूल असते. परंतू सध्या जिल्ह्यात निर्माण झालेले हे वातावरण दोन्ही पिकास धोकादायक ठरत आहे. त्यामुळे कालपर्यंत हिरवीकच्च दिवणारी मका आणि हळद पीक अचानक पिवळे पडल्याने शेतकरी हवालदिले झाले आहेत.
मेहकर तालुक्यात वाढले नुकसान
मेहकर तालुक्यात थंडीमुळे नुकसानाचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात ऊमरा देशमुख येथील बºयाच शेतकºयांच्या शेतातील हळद व मका करपली आहे. त्यामध्ये ऊमरा देशमुख येथील नारायण देशमुख यांच्या दोन एकर शेतातील हळद व मका पीक पुर्णता करपले आहे. तर साहेबराव कानोडजे यांच्या दीड एकर शेतातील हळद व एक एकर शेतातील मका पीक करपल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.