सर्दी, तापाच्या रुग्णांची खासगी रुग्णालयांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:57 AM2020-09-15T11:57:10+5:302020-09-15T11:57:19+5:30
अनेक रुग्ण औरंगाबाद, अकोला, जालन्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाचे लक्षण असल्याने सर्दी, तापाच्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची संख्या घटली तर दुसरीकडे खासगी रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. अनेक रुग्ण औरंगाबाद, अकोला, जालन्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे, यातील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
शहरी भागापुरता मर्यादीत असलेल्या कोरोना विषाणूचा ग्रामीण भागात शिरकाव झाला आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. सर्दी, खोकला आदी लक्षणे असलेले अनेक ग्रामस्थ क्वारंटीन होण्याच्या भितीने प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांएवजी खासगी रुग्णालयात उपचार करीत आहेत. त्यामुळे, कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने समुह संसर्गाची भिती आहे. अनेक खासगी डॉक्टरही पॉझिटीव्ह येत आहेत. त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती मिळत नसल्याने हे रुग्ण कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र जिल्हा भरात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यापेक्षा अनेक जण अकोला, औरंगाबाद, जालना व इतर शहरातील खासगी डॉक्टरांकडे उपचार करून घेत आहेत. असे रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्याविषयी माहिती स्थानिक आरोग्य विभाग आणि प्रशासनाला मिळण्यास बराच विलंब होतो. यादरम्यान त्या रुग्णांच्या संपर्कातील लोक बिनधास्तपणे फिरुन कोरोनाचे संक्रमण वाढवत आहेत.
इतर जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह आलेले रुग्ण थेट १० ते १५ दिवसांनी गावाकडे परततात. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून क्वारंटीन करून उपचार सुरू करणे आहे. मात्र, गामस्थ क्वारंटीन होण्याच्या भितीने सरकारी रुग्णालयांपासून दूरच राहत असल्याचे चित्र आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज २०० ते ३०० रुग्णांची तपासणी व्हायची. गत काही दिवसांपासून येथे १० ते २० रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. या परिसरातील सहा खासगी डॉक्टरही पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह रुग्णांची माहितीच मिळत नसल्याने कोरोना रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही हतबल असल्याचे चित्र आहे.
सर्दी, ताप, खोकला आदी त्रास असणाऱ्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही असे रुग्ण आल्यास त्यांचे समुपदेशन करून याविषयी स्थानिक प्रशासन व आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी. सध्या कॉन्टॅक्ट ट्रेसींग होत नसल्याने ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
- डॉ.किशोरकुमार बिबे,
वैद्यकीय अधिकारी, डोणगाव