अवकाळी पाऊस
By admin | Published: January 2, 2015 12:40 AM2015-01-02T00:40:16+5:302015-01-02T00:40:16+5:30
गारपिटीचाही तडाखा : खरिपापाठोपाठ रब्बीही धोक्यात.
बुलडाणा : नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेल्या गारांसह पावसाने १ जानेवारीच्या दुपारपर्यंंंत दमदार हजेरी लावली. आधीच दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्यांना रब्बी पिकापासून असलेली आशाही संपली. दुष्काळात तेरावा महिना, अशीच स्थिती या अवकाळी पावसामुळे झाली असून, जिल्हाभरात कमालीचा गारठा निर्माण झाला असून, सकाळपर्यंंत तब्बल ४३७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
मेहकर, सिंदेखडराजा, लोणार, शेगाव, खामगावातही पावसाने जोरदार हजेरी लावली. देऊळगावमही परिसरात वादळी वारा तसेच गारांचा पाऊस झाला. ३१ डिसेंबरच्या रात्रभर सुरू असलेला पाऊस १ जानेवारीला दुपारी १२ वाजेपर्यंंंत सुरूच होता. या पावसामुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये हरभरा, तूर, कपासी, ज्वारी, गहू, कांदा, मका तसेच डिग्रस येथे काही प्रमाणात द्राक्ष बागाचे मोठे नुकसान झाले.
संग्रामपूर तालुक्याला फटका
संग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारात झालेल्या गारपीटमुळे कांदा पीक उद्ध्वस्त झाले आहे, तर काकोडा, वकाणा गावामध्ये लिंबुच्या आकाराएवढी गार पडल्याने घरावरील कवेलु फुटले व ताडपत्री फाटल्या आहेत. वकाणा येथील गणेशराव खिरोडकार यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात ३१ डिसेंबरच्या रात्री हवा, पाऊस व गारांमुळे कांद्याच्या पिकासह भाजीपाला मातीमोल झाला आहे. कांद्याच्या वाफ्यात पाणी साचून पात गारीने झोडपली.काकोडा येथील शत्रुघ्न मारखैर यांनी तहसील कार्यालयाकडे नुकसानीबाबत अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये गावातील कांदा, गहू, हरभरा व घरांवरील छतांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. गारांची संख्या व आकार पाहता बोरीच्या झाडांची बोरेही पुर्णत: गळून पडली आहेत. काकोडा गावात तर घरामध्ये गारांचा खच साचला होता. लगातार तीन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
*धाड भागात २८ हजार हेक्टरवर पेरणीक्षेत्र धोक्यात
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसासोबत ३१ डिसेंबर रोजी धाड भागात गारांचा पाऊस झाल्याने रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले आहे. धाड, वरुड, सोयगाव, जामठी व चांडोळ परिसरात बोराएवढी गारपीट झाल्याने गहू, हरभरा, सूर्यफूल, कांदा, मका व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार दीपक बाजड यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी या पथकाने पाहणी केली असून, आर्थिक परिस्थितीने दबलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ आर्थिक मदतीची मागणी शेतकर्यांनी केली आहे.