बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आता जिल्हास्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 16:43 IST2020-05-19T16:43:14+5:302020-05-19T16:43:24+5:30
मंगळवार १९ मे रोजी बुलडाणा येथेच या उत्तरपत्रिकांच्या संकलनासाठी नियामकाना बोलाविले आहे.

बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आता जिल्हास्तरावर
- नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन हे नियामकांकडून जिल्हास्तरावरच व्हावे, अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरल्यानंतर अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने आपला यापूर्वीचा निर्णय बदलवित आता मंगळवार १९ मे रोजी बुलडाणा येथेच या उत्तरपत्रिकांच्या संकलनासाठी नियामकाना बोलाविले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावी व दहावीची परीक्षा पार पडली. दहावीच्या परीक्षेचा पेपर बाकी असतानाच कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाउन घोषित झाले. त्यामुळे दहावीचा पेपर न घेता त्याचे सरासरी गूण दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय शासकीय स्तरावर घेण्यात आला. बारावी व दहावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व गुणपत्रिका ह्या परीक्षक व मॉडरेटर यांच्याकडेच पडून होत्या. लॉकडाउनचा कालावधी सतत वाढत गेल्याने शिक्षण मंडळाने प्रत्येक जिल्हास्तरावर आपले अधिकारी व कर्मचारी पाठवून जिल्ह्यातील नियामकाकडून सर्व उत्तरपत्रिका व गुणपत्रिका गोळा करण्याचा निर्णय घेतला. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने यवतमाळ व वाशीम या दोन्ही जिल्ह्यात आपले अधिकारी व कर्मचारी पाठवून नियामकाकडून उत्तरपत्रिका व गुणपत्रिका गोळा केल्यात. अमरावती जिल्ह्यातील मॉडरेटर यांना शिक्षण मंडळाच्या कार्यालयातच बोलविण्यात आले होते. परंतु बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ह्या पद्धती राबवण्यास असमर्थता दर्शवित या दोन्ही जिल्ह्यातील मॉडरेटर यांनी अमरावती येथे शिक्षण मंडळाच्या कार्यालयात उत्तरपत्रिका व गुणपत्रिका पोहोचवून द्याव्यात असे परिपत्रक अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने काढले होते.
या परिपत्रका विरोधात विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनसह सर्व शिक्षक संघटनांनी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाला निवेदन देत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव अनिल पारधी यांनी नवीन परिपत्रक काढून बुलडाणा जिल्ह्यातील मॉडरेटर यांनी जिल्हास्तरावरच आपले साहित्य जमा करावे असे निर्देश दिले.
त्यानुषंगाने १९ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील बारावीच्या नियामकाना बुलडाणा येथे बोलाविण्यात आले. अकोला शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर तेथील निर्णय सध्या राखून ठेवण्यात आला आहे.