महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 11:57 AM2021-02-16T11:57:45+5:302021-02-16T11:57:52+5:30
Buldhana News महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बंद असलेली महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये सुरू करता येणार नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवांना पाठविले आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने टप्प्याटप्प्याने सुरुवातीला ९ ते १२पर्यंत व त्यानंतर ५ ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याविषयी चर्चा सुरू झाली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. तसेच याविषयी निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. बुलडाणा जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तसेच कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीचा विचार करता २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणेच सुरू असलेले ऑनलाइन वर्ग सुरू ठेवावे त्यानंतर जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करून महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. महाविद्यालय बंद राहणार असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.