जिल्ह्यात चार ठिकाणी झाल्या लसीकरणाच्या रंगीत तालमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:17+5:302021-01-09T04:29:17+5:30
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १३,५०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने ही रंगीत तालीम घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा ...
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील १३,५०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यासंदर्भाने ही रंगीत तालीम घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे उपस्थित हाेते.
या रंगीत तालमीमध्ये हुबेहूब लसीकरण मोहीम कशी राबविली जाईल त्यादृष्टीने प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली होती. सकाळी नऊ वाजता यास प्रारंभ झाला. नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या मोबाइल क्रमांकावर लसीकरण तारीख, वेळ व ठिकाणचा मॅसेज पाठविण्यात आला. त्यानंतर वेटिंग रूममध्ये मॅसेजची पडताळणी केल्यानंतर लाभार्थ्याची खात्री करण्यात आली. दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष प्रातिनिधीक स्वरूपात लस देण्यात आली, तर तिसऱ्या कक्षात ३० मिनिटांसाठी लाभार्थ्याला निरीक्षणासाठी बसविण्यात आले.
त्रिसूत्री पाळणे आवश्यक
लसीकरणानंतरही लाभार्थ्यांनी मास्क वापरणे, नियमित हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर पाळणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली. सोबतच लसीकरणासंदर्भातील बारकावे स्पष्ट केले. अत्यंत सूक्ष्मस्तरावर या ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीही कशा पद्धतीने हाताळावी याबाबतही यावेळी अवगत करण्यात येऊन प्रत्यक्ष त्याची रंगीत तालीम करण्यात आली.
पहिला डोस उजव्या दंडात
कोरोना लसीकरण मोहिमेत एकूण दोन डोस देण्यास येणार आहे. त्यातील पहिली डोस हा उजव्या दंडात देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनंतर उजव्या दंडात देण्यात येईल. पहिला डोस घेतल्यांतर प्रसंगी सौम्यस्वरूपाचा ताप येण्याची शक्यता असते. मात्र त्यातून घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, असेही डॉ. नितीन तडस यांनी स्पष्ट केले.