क्षारांच्या विघटनातून लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:18 AM2020-06-13T06:18:35+5:302020-06-13T06:19:07+5:30
अभ्यासक दिलीप दाभाडे यांचे मत : लालसर गुलाबी रंग झाल्याबाबत संशोधन गरजेचे; फेब्रुवारीमध्ये पाणी आटले
बुलडाणा : लोणार सरोवराच्या पाण्याचा बदललेला रंग हा त्यातील क्षारांच्या विघटनातून बदलला असावा, असे मत वाशिम येथील आरे महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख तथा लोणार सरोवराचे अभ्यासक प्रा. डॉ. दिलीप दाभाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. गत २५ वर्षांपासून ते लोणार सरोवराचा अभ्यास करत असून, उन्हाळ््यात लोणार सरोवरातील पाणी आटल्यामुळे त्यात क्षारांचे प्रमाण वाढले आहे. या क्षारांचे विघटन होऊन असा लालसर गुलाबी रंग दिसत असावा, असे ते म्हणाले. सूर्यप्रकाश सात रंगांचा बनला आहे. तो वस्तूवर पडल्यास त्यातील सहा रंग शोषल्या जातात व एकच रंग रिफ्लेक्ट होतो. त्याप्रमाणेच क्षारांच्या या विघटनातून सूर्यप्रकाशाच्या पडणाऱ्या किरणांपैकी हा विशिष्ट रंगच रिफ्लेक्ट होत असल्याने येथील पाण्याचा रंग बदलला असावा, असे त्यांनी सांगितले.
साधारणत: रासायनिक किंवा भौतिक प्रक्रिया होऊन असा रंग बदल होऊ शकतो. पण एकंदरीत स्थिती पाहता रंग बदलाचा झालेला हा प्रकार भौतिक प्रक्रिया अर्थात क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे झाला असावा, असे ते म्हणाले. फेब्रुवारीमध्ये सरोवराचे पाणी मोठ्या प्रमाणावर आटल्याचेही सरोवरावर अभ्यास करणारे डॉ. महेश तांदळे यांनी सांगितले. डॉ. दाभाडे यांच्या मार्गदर्शनातच त्यांनी लोणार सरोवराचा अभ्यास केला आहे. प्लॅनटॉन डायव्हरसिटी अॅन्ड इक्रोफिकेशन स्टेटर्स आॅफ लोणार क्रिएटर इंडिया हा विषय घेऊन त्यांनी पीएचडी केली आहे.
पाण्याचे नमुने तपासणार - राठोड
पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घेतले असून, ते संशोधनासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ येथे दिली.