कीडनाशक, तणनाशक औषधांच्या मिश्रणाने पिकांना धोका ; कृषी शास्त्रज्ञाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 06:23 PM2019-07-14T18:23:22+5:302019-07-14T18:28:13+5:30
कृषी विभागाचा सल्ला न घेता वेगवेगळ्या औषधांच्या घटकांचे मिश्रण करून फवारणी केल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: सध्या पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढलेले असताना हे तण नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या तणनाशक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यात आतापर्यंत काही ठिकाणी तणनाशक फवारणीमुळे सोयाबीन पीक जळाल्याचे प्रकार समोर आल्याने तणनाशक फवारणीची शेतकºयांमध्ये भिती निर्माण झाली आहे. परंतू कृषी विभागाचा सल्ला न घेता वेगवेगळ्या औषधांच्या घटकांचे मिश्रण करून फवारणी केल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात ७ लाख ३८ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन असून त्यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन पिकाखाली येते. सोयाबीनचे ४ लाख ६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर नियोजन आहे. सध्या खरीप हंगामाची पेरणी ८० टक्क्यापर्यंत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीची कामे आता अंतीम टप्प्यात आली आहे. जून अखेर व जुलै महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या पावसाने शेतातील पिके बहरली आहेत. संततधार पडलेल्या पावसामुळे पिकांच्यामध्ये तणाची वाढही जोमाने झालेली दिसून येते. पिकांमधील हे तण नष्ट करण्यासाठी शेतकरी तणनाशक औषधांची फवारणी करत आहेत. तर पिकांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी टॉनिक व किटकांच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कीड नाशकांचा फवारा सध्या पिकांवर मारल्या जात आहे. परंतू या औषधांच्या फवारणीचा विपरीत परिणाम झाल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. मेहकर तालुक्यात कळपविहिर याठिकाणी १६ एकरातील सोयाबीन तर लोणार तालुक्यातील शारा शेतशिवारातील १५ एकर शेतातील सोयाबीन पीक तणनाशक फवारणीमुळे जळाल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर तणनाशक फवारावे किंवा नाही, असा संभ्रम शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने दोन्ही ठिकाणी पाहणी केली असून, पुढील अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
परत-परत फवारणी करण्याचे काम पडू नये, यासाठी वेगवेगळी औषधी शेतकरी एकाच पंपात टाकतात. एकाच पंपामध्ये कीडनाशक, तणनाशक, टॉनिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे औषधांचे मिश्रन करून फवारणी केल्या जाते. त्यामुळे औषधांच्या मिश्रणांचा फवार पिकांसाठी धोकादाय असल्याचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दोन दिवसात कळणार ‘फॉल्ट’
मेहकर तालुक्यातील कळपविहीर येथे १६ एकरातील सोयाबीन जळाल्यानंतर तेच औषध दुसºयाच्या शेतावर कृषी विभागाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत फवारणी करून बघण्यात आले आहे. त्यामुळे त्या शेतात सुद्धा काही विपरीत परिणाम झाला तर औषध कारणीभूत असल्याचे समजण्यात येईल. दोन ते तीन दिवसात सोयाबीन जळण्या मागचे नमेके कारण स्पष्ट होईल.
एकाच पंपात वेगवेगळ्या औषधांची फवारणी एकाच वेळी होऊ शकते; म्हणून औषधांचे मिश्रण करून फवारणी केल्यास पिके जळण्याचे प्रकार घडू शकतात. कळपविहीर येथील शेतकºयांनी वापरलेले तेच औषध इतर ठिकाणच्या शेतकºयांनी सुद्धा फवारले आहे, मात्र त्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही. त्यामुळे सोयाबीन जळण्याच्या या प्रकारामागे नेमके कारण लवकरच समोर येईल. शेतकºयांनी कुठलीही औषधी फवारणी करण्यापूर्वी कृषी विभागाच्या शिफारशीनुसारच ती फवारावी.
- डॉ. सी. पी. जायभाये,
कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.