खामगावात ‘बाप्पा’ला श्रद्धेचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:56 PM2017-09-05T23:56:06+5:302017-09-05T23:56:48+5:30

सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाची १0 दिवस मनोभावे  आराधना केल्यानंतर गुरुवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी  आपल्या लाडक्या गणरायाला भव्य मिरवणूक काढून वाजत-गाजत  उत्साही वातावरणात निरोप दिला. सकाळी ९ वाजता मानाचा लाकडी  गणपती मंदिरात आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात  आली.

Commitment of faith to 'Bappa' in Khamagaga | खामगावात ‘बाप्पा’ला श्रद्धेचा निरोप

खामगावात ‘बाप्पा’ला श्रद्धेचा निरोप

Next
ठळक मुद्देखामगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेतसकाळी ९ वाजता मानाचा लाकडी गणपती मंदिरापासून झाली  मिरवणुकीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाची १0 दिवस मनोभावे  आराधना केल्यानंतर गुरुवारी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी  आपल्या लाडक्या गणरायाला भव्य मिरवणूक काढून वाजत-गाजत  उत्साही वातावरणात निरोप दिला. सकाळी ९ वाजता मानाचा लाकडी  गणपती मंदिरात आरती केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात करण्यात  आली. मानाचा लाकडी गणपती फरशी भागात आल्यानंतर शहरातील  मिरवणूक सुरू झाली. या मिरवणुकीमध्ये अग्रभागी मानाचा लाकडी  गणपती त्यानंतर तानाजी गणेश मंडळ शिवाजी नगर, हनुमान गणेश  मंडळ, राणा गणेश मंडळ, एकता गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ,  जय गजानन गणेश मंडळ, सिंधी गणेश मंडळ, रामदल गणेश मंडळ,  जगदंबा गणेश मंडळ, स्वामी गणेश मंडळ, अमरलक्ष्मी गणेश मंडळ,  दत्तगुरू गणेश मंडळ, वीर हनुमान गणेश मंडळ, जय बजरंग गणेश  मंडळ, वंदेमातरम् गणेश मंडळ, तेलगुराज गणेश मंडळ, श्रीकृष्ण  गणेश मंडळ, सराफा गणेश मंडळ, जय संतोषी मॉ गणेश मंडळ, मॉ  आत्मशक्ती गणेश मंडळ, नेताजी गणेश मंडळ, क्रांती गणेश मंडळ,  चंदनशेष गणेश मंडळ, त्रिशुल गणेश मंडळ, राष्ट्रीय गणेश मंडळ,  जय भवानी गणेश मंडळ अशी २७ मंडळे सहभागी झाली होती.  यावर्षीही निर्मल टर्निंग ते फाटकपुरा भागात कलम १४४ (३) हे  कलम लावण्यात आले होते. या कलमानुसार पोलीस परवानगी,  बंदोबस्तावरील कर्मचारी तसेच पूर्वपरवानगीशिवाय गणेश मंडळ  कार्यकर्त्यांना फिरण्यास मनाई करण्यात आली होती. यावर्षी निर्मल  टर्निंगपासून एक-एक मंडळ याप्रमाणे फाटकपुरा भागापर्यंत मिरवणूक  काढण्यात आली. फाटकपुरा भागातून पुढील मंडळ निघून गेल्यानंतर  निर्मल टर्निंग येथून नंतरच्या मंडळाला प्रवेश देण्यात आला. यावेळी  चोख पोलीस  बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच आवश्यक  ठिकाणी सीसी कॅमेरे व शूटिंग कॅमेरे लावण्यात आले होते.  संवेदनशील भागातील परिसरात बॅरिकेट लावण्यात आले होते. 
चहा, नाश्ता व जलसेवा
मिरवणुकीत सहभागी गणेशभक्तांसाठी विविध जणांनी सेवा दिली.  यामध्ये ब्रह्मदलाच्यावतीने पुरी-भाजी, भादवी माता सिद्धेश्‍वर लाकडी  गणपती मंडळाच्यावतीने ११ क्विंटलचे पोहे, खामगाव अर्बन  बँकेच्यावतीने चहा, सदगरू श्रीधर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने  खिचडी, सुरेका परिवाराकडून पोळी-भाजी तर पुरवार परिवार, बोहरा  परिवार, सूरज धानुका, तेरवाडिया परिवार यांच्यासह अनेकांनी  गणेशभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सेवा दिली. 
मान्यवरांचा मिरवणुकीत सहभाग
मिरवणुकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री ना.भाऊसाहेब  फुंडकर, आ.अँड.आकाश फुंडकर, माजी आ.दिलीपकुमार सानंदा,  माजी आ. नानाभाऊ कोकरे, नगराध्यक्ष  अनिता डवरे, माजी  नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा, माजी न.प. उपाध्यक्ष वैभव डवरे,  कृउबास सभापती संतोष टाले, भारिप-बमसंचे अशोक सोनोने  आदींसह इतर पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी आदींचा  सहभाग होता. मस्तान चौकात ना.भाऊसाहेब फुंडकर, आ.अँड.  आकाश फुंडकर यांनी गणेश मंडळ पदाधिकार्‍यांचे स्वागत केले, तर  सानंदा मित्र मंडळाच्यावतीने गणेश मंडळ पदाधिकार्‍यांचे स्वागत  करण्यात आले. विविध नगरसेवकांनीसुद्धा हजेरी लावली.

हे ठरले मिरवणुकीतील आकर्षण
तानाजी मंडळाचे अमृतसर,पंजाब येथील निशान ए खालसा पथकाची  चित्ताकर्षक प्रात्यक्षिके, तानाजी व चंदनशेष मंडळाचे मुलींचे मल्लखांब  पथकाच्या कसरती,  हनुमान मंडळाचे लाठीकाठी, तलवारबाजी व  अन्य कसरती,  राणा मंडळाचे गणपती स्वार असलेला अश्‍वरथ तसेच  नृत्यकलाकार तर वंदेमातरम् गणेशोत्सव मंडळाने गो ग्रीनचा संदेश  देणारे टी-शर्ट व जनजागृती करणारे फलक लावले होते. वीर हनुमान  मंडळाने सर्वधर्मसमभाव व पर्यावरण बचाओविषयी, श्रीकृष्ण मंडळ  आठवडी बाजारच्यावतीने वृक्षारोपण याविषयी जनजागृती केली.  चंदनशेष मंडळासोबतच इतर मंडळांनी विविध सामाजिक विषयांवर  गणेशोत्सव या लोकोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली. बाळापूर  फै लातील जगदंबा मंडळाची रुद्र अवतार धारण केलेली गणेशमूर्ती  सर्वांचे आकर्षण ठरली होती.

मिरवणुकीवर निगराणीसाठी पोलिसांचा तिसरा डोळा
विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी मुख्य चौकांमध्ये  सीसी कॅमेर्‍यांसह दुर्बिणीचा वापर केला, तसेच विविध चौकांत  मिरवणूक पास करण्यासाठी हिरव्या व लाल रंगाचे दिवे लावून  सिग्नलची व्यवस्था करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी चोख  पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. यामध्ये स्वत: पोलीस अधीक्षक  शशीकुमार मीणा, एएसपी श्याम घुगे, डीवायएसपी प्रदीप पाटील,  शहर पोस्टेचे ठाणेदार उत्तमराव जाधव, शिवाजी नगर पोलीस  स्टेशनचे ठाणेदार संतोष ताले यांनी हजर राहून विविध पोलीस  अधिकार्‍यांसह पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ, एसआरपीएफ  जवान, दंगाकाबू पथकासह होमगार्ड आदी अनेक जवानांना  ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, कृषी मंत्री तथा  पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी भेट दिली.

Web Title: Commitment of faith to 'Bappa' in Khamagaga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.