प्रत्येक ग्रामपंचायतीस वृक्ष लागवडीचे एकसमान उद्दिष्ट
By admin | Published: July 2, 2017 09:16 AM2017-07-02T09:16:03+5:302017-07-02T09:16:03+5:30
वृक्ष लागवड मोहिमेत ८६९ ग्रामपंचायतींचा सहभाग; ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा जागर सुरू
हर्षनंदन वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात १ ते ७ जुलैदरम्यान मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. शासनाने मोठ्या व लहान ग्रामपंचायतींचे विभाजन न करता सर्वांना एकसमान ३६४ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. जिल्ह्यात एकूण ८६९ ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून, उदिष्ट पूर्ण करण्याकरिता प्रशासनाचे विविध विभाग या अभियानात सहभागी होऊन ह्यवृक्ष लावा वृक्ष जगवाह्णचा जागर करीत आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली असल्याने वातावरण आल्हाददायक आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्याातच जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ तालुक्यात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड मोहिमेत तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक कार्यालये, महसूल विभाग, बांधकाम विभाग, शासकीय दवाखाने यांच्याकडूनही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोकळ्या जागेत, रस्त्याच्या दुतर्फा, जलयुक्त शिवारच्या बांधावर करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीकरिता लागणारी रोपे शासकीय तसेच खासगी रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. शासकीय कार्यालयांना देण्यात येणारी रोपे व निमशासकीय विभागांना, सामाजिक संघटनांना कमी दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वृक्ष लागवडीस रोपांची मागणी केलेल्या संस्थेवरच लागवड करण्यात आलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात यावर्षी प्रशासनाच्या विविध यंत्रणा सहभागी झाल्यामुळे ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा परिषद यंत्रणेला ३ लाख १६ हजार ३१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिल्यामुळे जिल्हा परिषदेचे १३ पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतींची संख्या पाहून उद्दिष्ट दिले आहे.
जिल्ह्यात एकूण ८६९ ग्रामपंचायती असून, प्रत्येक ग्रामपंचायतीस ३६४ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देऊन जि.प. प्रशासनाने वृक्ष लागवड मोहिमेची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू केली आहे.
पंचायत समितीनिहाय वृक्ष रोपणाचे उद्दिष्ट
जिल्ह्यात यावर्षी ८ लाख ५२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्हा परिषद यंत्रणेला ३ लाख १६ हजार ३१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यात बुलडाणा तालुक्यात २४ हजार २४, चिखली तालुक्यात ३६ हजार ३६, देऊळगाव राजा तालुक्यात १७ हजार ४७२, सिंदखेडराजा तालुक्यात २८ हजार ७५६, मेहकर तालुक्यात ३६ हजार ६७२, लोणार तालुक्यात २१ हजार ४७६, खामगाव तालुक्यात ३५ हजार ३०८, शेगाव तालुक्यात १७ हजार १०८, जळगाव जामोद तालुक्यात १७ हजार १०८, संग्रामपूर तालुक्यात १८ हजार २००, नांदूरा २३ हजार ६६०, मलकापूर १७ हजार ८३६, मोताळा २३ हजार ६६० असा प्रकारे जिल्हा परिषद यंत्रणेला जिल्ह्यातील १३ पंचायत समिती अंतर्गत एकूण ३ लाख १६ हजार ३१६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.