ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:21+5:302021-06-30T04:22:21+5:30

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने ...

Compensate farmers affected by cloudburst | ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

ढगफुटीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Next

चिखल तुडवत केली नुकसानीची पाहणी

चिखली : अंबाशी, आमखेड, हिवरखेड, गांगलगाव, एकलारासह या भागात २८ जून रोजी ढगफुटी झाल्याने पावसाने मोठा कहर केला. आमखेडचा पाझर तलाव फुटल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. अंबाशीसह इतर गावांत देखील पाणी घुसल्याने अनेकांच्या घरांचेही नुकसान झाले. या महापुराने हजारो हेक्टर शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २९ जून रोजी या भागात नुकसानीची पाहणी केली. चिखल तुडवत आणि पाण्यातून मार्ग काढत रविकांत तुपकरांनी या भागात पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून निघणारे आहे, शासनाने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

रविकांत तुपकरांनी अंबाशी, आमखेड, हिवरखेड भागात ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. परिस्थिती एवढी बिकट होती की, चिखल तुडवत, पाण्यातून आणि साचलेल्या गाळातून मार्ग काढत जावे लागले. रविकांत तुपकर पाहणीसाठी गेले असता शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

आमखेड येथील तलाव फुटला, अंबाशी येथील तलावाच्या भिंतीला तडा गेल्याने एका बाजूने भिंत खचली, गांगलगाव, बेराळा, एकलारा यासह इतर शिवारात ढगफुटीने नदी, नाल्यांमधील पाण्याने मार्ग सोडून शेतांचा रस्ता धरला. एकंदरीत या महापुराने दहा ते बारा गावांत प्रचंड नुकसान केले. हजारो हेक्टर शेतजमीन वाहून गेली, विहिरी खचल्या, स्प्रिंकलर सेट, पाइप, विहिरीतील मोटारी, बैलगाड्या आणि इतर साहित्य देखील वाहून गेले. शेतातील ५ ते सहा फुटाचा थर वाहून गेल्याने आता या जमिनी यावर्षी पुन्हा पेरणीसाठी तयार होऊ शकत नाहीत. शेतीच्या मशागतीसाठी लागलेला खर्च, कर्ज काढून पेरणीला लावलेला खर्च, बियाणे आणि खतांचा खर्च तर वाया गेलाच, शिवाय नव्याने जमिनीचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

यावेळी 'स्वाभिमानी'चे मयूर बोर्डे, नितीन राजपूत, विनायक सरनाईक, रामेश्वर अंभोरे, अनिल वाकोडे, रामेश्वर परिहार, संतोष शेळके, अंबाशीचे सरपंच शिवानंद गायकवाड, विनोद देशमुख, नितीन देशमुख, गणेश भाकडे, प्रदीप वाघ, जयराम वाघ यांच्यासह गावकरी व 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला

झालेल्या नुकसानीची रविकांत तुपकर यांना माहिती देताना अनेक शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. एकाच दिवसात पिके होत्याची नव्हती झाली आणि जमिनीही खरडून गेल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यांना धीर देत, या संकटाचाही धैर्याने सामना करण्याचे आवाहन केले. नुकसान भरपाईसाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन छेडू, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत

आमखेड येथील तलावाच्या भिंतीवरील वनस्पती काढल्या असत्या तर ही भिंत अर्धी खचली नसती. कारण झाडांच्या मुळांनी ही भिंत पोखरली गेली. तसेच आमखेड तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याची गावकऱ्यांची मागणी होती. परंतु आवश्यक तशी भिंतीची उंची न वाढविल्याने व सांडवा नीट न काढल्याने हे धरण फुटले. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ त्या भिंतीची उंची वाढवून नव्याने भिंत बांधण्याचे काम तात्काळ हाती घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांच्या भिंतीवरील वनस्पती काढण्याचे काम दरवर्षी करणे गरजेचे आहे. अन्यथा असे प्रकार वारंवार घडतील, असे मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केले.

Web Title: Compensate farmers affected by cloudburst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.