अन्नपुरवठा मंत्र्यांकडे करणार तक्रार - रायमुलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:20 AM2017-08-21T00:20:05+5:302017-08-21T00:20:20+5:30
मेहकर: स्वस्त धान्य योजना गोरगरिबांसाठी लाभदायक असली तरी काही महिन्यांपासून जिल्हय़ात रेशनच्या अन्नधान्याची अफरा तफर मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. श्रीनाथ ट्रान्सपोर्ट या संस्थेला बुलडाणा जिल्हय़ाचे द्वारपोच अन्नधान्याचे कंत्राट मिळाल्यापासून अन्नधान्याचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब जनता अन्नधान्यापासून वंचित राहत आहे. यासंदर्भात चौकशी करून ही संस्था काळ्या यादीत टाकण्यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा वरिष्ठ अधिकार्यांकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याची माहिती आ. संजय रायमुलकर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

शासनाने स्वस्त धान्य दुकानांमधून शहरी तथा ग्रामीण भागातील गोरगरीब अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, आदींसाठी गहू, साखर, तांदूळ, तेल उपलब्ध करून दिले आहे. सदर अन्नधान्य गरिबांना मिळणे गरजेचे आहे. स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच माल मिळावा, अन्नधान्याचा काळाबाजार बंद व्हावा, यासाठी शासनाने द्वारपोच अन्नधान्य योजना सुरू केली आहे. या योजनेचा बुलडाणा जिल्हय़ाचा कंत्राट श्रीनाथ ट्रान्सपोर्टचे राजू गुप्त यांना देण्यात आला आहे; परंतु जिल्ह्यामध्ये अन्नधान्याचा काळाबाजार वाढला आहे. चिखली, अमडापूर, साखरखेर्डा, जनुना, सोनाटी यासह घाटाखालीसुद्धा अनेक वेळा गहू व तांदुळाच्या गाड्या पकडण्यात आल्या आहेत; परंतु गाड्या पकडल्यानंतर ते वाहन कोणाचे, माल हा कोणत्या दुकानदाराचा आहे. कोणाच्या सांगण्यावरून अन्नधान्याची अफरातफर सुरू होती, याची चौकशी न होता, केवळ मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल करून ही सर्व प्रकरणे दाबण्यात आली आहेत.
या मागचा मुख्य सूत्रधार कोण, याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही.
बुलडाणा जिल्हय़ातील अन्नधान्याचा माल हा लोणार मार्गे लोणी सखाराम महाराज, मंठा, नागपूर आदी भागात नेऊन खुलेआम विकल्याचे आ. संजय रायमुलकर यांनी सांगितले आहे. राजू गुप्ता यांनी जिल्हय़ातील प्रत्येक अन्नधान्याच्या गोडाऊनवर तुरळक पगारावर वाहतूक प्रतिनिधी नेमले आहे. राजू गुप्ता यांचे कोणतेच नियंत्रण द्वारपोच याजनेवर नाही. केवळ फोनवरच सर्व कारभार सुरू आहे. जिल्हय़ात झालेल्या अन्नधान्याच्या काळ्या बाजाराचे पुरावे आहेत. तर ठिकठिकाणच्या अन्नपुरवठा अधिकार्यांनी कारवाईचे काय केले, याचे पुरावे आमच्याकडे असून राजू गुप्ता यांच्याकडून सदर कंत्राट काढून घ्यावे, तसेच आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी माल पकडला त्या-त्या ठिकाणच्या अन्नपुरवठा अधिकार्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, यासाठी अन्नपुरवठा मंत्री तथा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यांकडे पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे आमदार संजय रायमुलकर यांनी सांगितले.
जनुना, सोनाटी येथील प्रकरणाची चौकशी व्हावी!
मेहकर तालुक्यातील सोनाटी व जनुना येथे काही दिवसांपूर्वी तांदुळाचा माल पकडण्यात आला होता; परंतु या मालाची चौकशी अद्यापही पूर्ण झाली नसून, कोणावरही कारवाई झाली नाही. सोनाटी येथील तांदूळ हा एका खासगी व्यक्तीचा असल्याचे अन्न पुरवठा कार्यालयाकडून सांगण्यात आले; मात्र जर हा माल खासगी व्यक्तीचा आहे तर मग तो माल मेहकर येथील गोडाऊनला का ठेवण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित होत असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.