जलयुक्त शिवार अभियानाची कामे मुदतीत पूर्ण करा!
By admin | Published: May 12, 2017 08:06 AM2017-05-12T08:06:21+5:302017-05-12T08:06:21+5:30
जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या अधिका-यांना सूचना
बुलडाणा : राज्यभर जलयुक्त शिवार ही फलदायी योजना ठरली आहे. या योजनेचे दुरगामी परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ही योजना लोकचळवळीच्या रुपामध्ये समोर येत आहे. या योजनेच्या अनुकूल परिणामांसाठी सर्व यंत्रणांनी व अधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. या अभियानातील कामे विहीत कालावधीत पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प अध्यक्ष उमा तायडे, आमदार आकाश फुंडकर, डॉ. संजय रायमुलकर, डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षन्मुखराज, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.
सन २०१६ - १७ मध्ये निवडलेल्या २४५ गावांतील कामे विनाविलंब पूर्ण करण्याचे आदेश देत शिंदे म्हणाले की, सन २०१५ - १६ व २०१६ - १७ मधील प्रस्तावित केलेली आणि प्रगतीपथावर असणारी कामे पूर्ण करावी. सर्व यंत्रणांनी जबाबदारी यशस्विरीत्या पार पाडावी. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविल्या जावू शकतो. त्याचे उदाहरणे जिल्ह्यात पाहायला मिळाली. भूजल संरक्षित करून सिंचन वाढविण्यासाठी ही योजना वरदान ठरली आहे. त्यामुळे स्वत:चे काम समजून जलयुक्तची कामे करावी. या अभियानामुळे जिल्ह्यात जल व मृदा संधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे झाली. या कामांमुळे भूजल पातळीत दोन मीटरने वाढ नोंदविण्यात आली आहे, तसेच ४५ हजार २७० टीसीएम पाणीसाठा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. या पाणीसाठ्यातून ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर सिंचन निर्मिती करण्यात आलेली आहे. अभियानापूर्वी जिल्ह्यात ८० गावात टँकर सुरू होते. या अभियानात ही सर्व ८० टँकरग्रस्त गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांची टँकरमुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, तसेच जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याची ५८ गावांमध्ये कामे सुरू आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही मोहीमही प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना राम शिंदे यांनी दिल्या.