व्यापाराला आजपासून संपूर्ण स्वातंत्र्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:36 AM2021-08-15T04:36:10+5:302021-08-15T04:36:10+5:30
बुलडाणा : काेराेनामुळे संकटात सापडलेल्या व्यापार क्षेत्राला १५ ऑगस्टपासून स्वातंत्र्य मिळणार असून आठवड्याच्या सर्वच दिवशी रात्री १० वाजेपर्यंत दुकाने ...
बुलडाणा : काेराेनामुळे संकटात सापडलेल्या व्यापार क्षेत्राला १५ ऑगस्टपासून स्वातंत्र्य मिळणार असून आठवड्याच्या सर्वच दिवशी रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे़ याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी एस़ रामामूर्ती यांनी जारी केले आहे़ या आदेशाची अंमलबाजवणी १५ ऑगस्टपासून जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात करण्यात येणार आहे़ या निर्णयामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे़
काेराेना संसर्गामुळे गत वर्षापासून व्यापार माेठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे़ काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत़ दुकानांसह खुली आणि बंदिस्त उपाहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहे़ शाॅपिंग माॅल, उपाहारगृहे आणि बार रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ पार्सल सेवा मात्र २४ तास सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे़ दुकाने आणि उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांनी लसीचे दाेन्ही डाेस घेणे बंधनकारक आहे़ तसेच दुसरा डाेस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण हाेणे गरजेचे आहे़ व्यायामशाळा, याेगसेंटर, सलून स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे़ लसीचे दाेन्ही डाेस घेतलेली शासकीय कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ तसेच खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी २४ तास सुरू ठेवता येणार आहे़
विवाह साेहळ्यांना उपस्थितीची मर्यादा वाढवली
खुल्या प्रांगणातील, लाॅन किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह साेहळे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे़ यामध्ये जास्तीत जास्त २०० लाेकांना उपस्थित राहण्याची मर्यादा राहणार आहे़ बंदिस्त मंगल कार्यालय, हाॅटेलमध्ये क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे़
धार्मिक स्थळे बंदच राहणार
काेराेनाविषयक निर्बंध माेठ्या प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी जिल्ह्यातील धार्मिक स्थळे मात्र पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्सही बंद राहणार आहेत़ नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईसाठी शहरी भागासाठी नगरपालिका व पाेलीस विभागाचे संयुक्त पथक तर ग्रामीण भागासाठी पाेलिसांबराेबर ग्रामपंचायतीचे पथक तैनात राहणार आहे़