डीएपी खतासाठी इतर खते घेण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:13+5:302021-06-16T04:46:13+5:30
राहेरी बु : वातावरणातील बदल आणि काेराेनामुळे लावलेल्या निर्बंधामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेले आहेत़. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे ...
राहेरी बु : वातावरणातील बदल आणि काेराेनामुळे लावलेल्या निर्बंधामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेले आहेत़. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाणे आणि खते घेण्यासाठी धडपड करावी लागत असतानाच, कृषी सेवा केंद्रसंचालक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याचे चित्र सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड परिसरात आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दुसरबीड येथे शेतकऱ्यांना डीएपी़ खत हवे असल्यास त्याला पाच किलो मायक्रोन्युट्रिएंटची बकेट घेण्याची सक्ती काही कृषी सेवा केंद्र संचालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे, शेतकरी अडचणीत आले आहेत़. गेल्या खरीप हंगामामध्ये पाऊस चांगला होऊनही उत्पन्नात घट झाल्याने जेमतेम उत्पन्नावरच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागले आहे. यावर्षी तरी शेतीपूरक पाऊस होईल व दोन पैसे पदरात पडतील, या आशेवर शेतकरी मोठ्या उत्साहाने शेती कामाला लागले आहेत. व्याजाने किंवा उसनवारी करून पैसे आणून शेतीसाठी लागणारे बी-बियाणे व खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. परंतु काही कृषी सेवा केंद्रसंचालक या संधीचा लाभ घेत आहेत़. डीएपी खत हवे असल्यास मायक्रोन्युट्रीएंटची बकेट घ्यावीच लागेल, तरच खत मिळेल, असा फाॅर्म्युला सुरू केला असून, शेतकऱ्याची एकप्रकारे आर्थिक पिळवणूक होताना दिसून येत आहे. कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन अशा कृषी संचालकांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे़
मी दुसरबीड येथील एका कृषी केंद्रावर डीएपी़ खत देण्यासाठी गेलो असता, मला त्या कृषी केंद्रचालकाने तुम्हाला जर डीएपी खत घ्यायचे असल्यास प्रत्येक एका डीएपी पोत्यासोबत एक बकेट मायक्रोन्युट्रिएंट घ्यावेच लागेल, असे सांगितले. इतर खतांची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.
नितीन देशमुख, शेतकरी