सक्तीची वीज देयक वसुली, महावितरण कार्यालयात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:48 AM2021-02-26T04:48:37+5:302021-02-26T04:48:37+5:30
रविकांत तुपकर यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात धडक देत अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा केली. गेल्या ...
रविकांत तुपकर यांनी २५ फेब्रुवारी रोजी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात धडक देत अधीक्षक अभियंत्यांशी चर्चा केली.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाने सर्व उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांचा रोजगार गेला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे ते आर्थिक संकटात आहेत. अशातच महावितरणकडून आता सक्तीची वीज बिल वुसली केली जात असून कर्मचारी अर्वाच्य भाषेत बोलत आहेत. वीज तोडणीची मोहीम राबविली जात आहे. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहे. शिवाय ऊर्जा मंत्र्यांनी कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. नंतर पुन्हा घुमजाव करत वीज बिल भरावेच लागेल, असे सांगितले. नागरिकांकडे सध्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी देखील पुरेशी रक्कम नाही; त्यामुळे बिल कसे भरणार? कोराना काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीवर आम्ही ठाम असून सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, वीज पुरवठा खंडित करणे थांबवावे, अशी मागणी तुपकरांनी अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली. आधीचे लॉकडाऊन आणि पुन्हा सुरू झालेले मिनी लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनता, व्यापारी हतबल झाले आहेत. अशा परिस्थितीत त्यांची वीज तोडून त्यांना अंधारात ठेवणे योग्य आहे का, असा सवाल करीत यापुढे वीज तोडणी केल्यास याद राखा, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. सोबतच वीज तोडण्यासाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘स्वाभिमानी’शी संघर्ष करावा लागेल, वीज वितरण कंपनीच्या विरोधात गावागावात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहोत, असेही तुपकरांनी यावेळी स्पष्ट केले. वीज तोडणी करण्यासाठी कर्मचारी आल्यास राणा चंदन, पवन देशमुख व स्वाभिमानी हेल्पलाइन सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. यावेळी राणा चंदन, पवन देशमुख, शे. रफीक शे. करीम, अनिल पडोळ, आकाश माळोदे, दत्तात्रय जेऊघाले, कैलास जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.