युरियासोबत शेतकऱ्यांना मायक्रोल टाॅनिक खरेदीची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:15 AM2021-07-20T11:15:07+5:302021-07-20T11:15:17+5:30
Agriculture Sector News : युरिया खतासोबत मायक्रोल टाॅनिक घेतले तरच खत मिळेल, अशी अडवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेतकऱ्यांना खत विक्री करताना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त साहित्य देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करू नये, असे निर्देश असतानाही खामगाव शहरातील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खतासोबत मायक्रोल टाॅनिक घेतले तरच खत मिळेल, अशी अडवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. ही बाब कृषी विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पुरेशा आणि योग्य दरात उपलब्ध कराव्यात, असा आदेश आधीच कृषी विभागाने दिला आहे. तसेच खत विक्री करताना त्यासोबत इतर कोणतीही निविष्ठा खरेदीची सक्ती करू नये किंवा लिंकिंग करू नये, तसे केल्यास गंभीर कारवाईचा इशाराही देण्यात आला. तरीही खामगाव शहरातील काही खत विक्रेते त्या आदेशाला जुमानत नसल्याचा प्रकार सोमवारी सरकी लाइन परिसरात दिसून आला. शेतकरी गोपाल चव्हाण यांनी युरिया खत मिळण्यासाठी या परिसरातील केंद्रात सोमवारी दुपारी धाव घेतली. यावेळी त्यांना युरिया खत हवे असेल तर त्यासोबत मायक्रोल नामक टाॅनिक घ्यावे लागेल, असा पवित्रा कृषी केंद्र चालकांनी घेतला. त्या टाॅनिकची किंमत ३५० रुपये आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना गरज नसताना टाॅनिक खरेदी करायला लावणे, हा प्रकार खामगावात सर्रासपणे सुरू झाला आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे, कृषी विभागाने दिलेल्या निर्देशांचीही पायमल्ली केली जात आहे.
खतासोबत लिंकिंग करू नये, असे कृषी सेवा केंद्र संचालकांना आधीच निर्देश दिले आहेत. तरीही असा प्रकार घडत असेल तर चौकशी केली जाईल. संबंधितांना निर्देश दिले जातील.
- जी. बी. गिरी, तालुका कृषी अधिकारी, खामगाव.