रुग्णांना भेटायला येणाऱ्यांना कोरोना चाचणीची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:30 AM2021-01-13T05:30:12+5:302021-01-13T05:30:12+5:30
लोणार : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर सुरू झाले आहे. शनिवारी लोणार ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णास भेटायला ...
लोणार : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर सुरू झाले आहे. शनिवारी लोणार ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णास भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढायला लागली, त्यामुळे रुग्णाला भेटायला येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांचे प्रमाण कमी झाले आहे.
कोरोना संक्रमणाच्या भीतीने कुटुंब नियोजन शस्रक्रिया शिबिरही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोना संक्रमणाचा धोका आटोक्यात आल्याने शासकीय स्तरावर कुटुंब नियोजन शस्रक्रिया शिबिर आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. लोणार तालुक्यात लॉकडाऊन नंतरचे पहिले कुटुंब नियोजन शिबिर दि. ९ जानेवारी रोजी लोणार ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ३५ महिलांची प्रथम कोविड चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले. तद्नंतर त्यांच्यावर कुटुंब नियोजन शस्रक्रिया करण्यात आल्या. रुग्ण महिलांना आप्तस्वकीय, नातेवाईक यांचा भेटण्यास येण्याचा सपाटा सुरू झाल्याने लोणार ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी होण्याचे प्रमाण वाढू लागले. येणाऱ्या नातेवाइकांना कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून आले. ही बाब आरोग्य विभाग अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांनी रुग्णालयात भेटण्यास येणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असल्याचे सांगत आपण कोरोना चाचणी करून घेऊ, मग तुम्ही रुग्णास भेटायला जा, असे सांगण्यात आले. कोरोना चाचणी होणार असल्याने, अनेकांनी तेथून चुपचाप निघून जाण्यास धन्यता मानली. कोरोना चाचणी करण्याची आणि क्वारंटाइन होण्याची भीती अनेकांमध्ये दिसून आली.
नातेवाइकांची गर्दी झाली कमी
रुग्णालयात भेटायला जायचे असल्यास कोरोना चाचणी करावी लागते, याची चर्चा मात्र चांगलीच रंगली. यामुळे रुग्णालय परिसरात विनाकरण होणारी गर्दी, आता अचानक कमी झालेली पाहायला मिळाली. आराम करण्याची आवश्यकता असताना विनाकारण होणाऱ्या गर्दीच्या त्रासापासून रुग्णांची सुटका झाल्याने त्यांनाही चांगला दिलासा मिळाला.
कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कायम असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णास भेटायला येणाऱ्यास कोरोना चाचणी अनिर्वाय केली आहे.
डॉ. भास्कर मापारी, व्यवस्थापक, कोविड सेंटर, लोणार