पुरातन देवीच्या मंदिराची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:40+5:302021-04-05T04:30:40+5:30
सिंदखेडराजा : येथून पाच किलोमीटरवर असलेल्या शिवानी टाका येथील डोंगरावरील देवीच्या प्राचीन मंदिराची दुरवस्था झाली आहे. या मंदिराचे जतन ...
सिंदखेडराजा : येथून पाच किलोमीटरवर असलेल्या शिवानी टाका येथील डोंगरावरील देवीच्या प्राचीन मंदिराची दुरवस्था झाली आहे. या मंदिराचे जतन आणि विकास होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात सापडला आहे.
सिंदेखड राजा तालुक्यातील ऐतिहासिक वैभव प्राप्त आहे. शिवानी टाका येथे तुळजापूरचे ठाणे आहे. हजारो भाविक श्रद्धास्थात असलेल्या मंदिरात नेहमी भाविकांची वर्दळ असते. राजे लखोजी राव जाधव यांच्या काळात शिवानी येथील देवीचे प्राचीन मंदिर उंच टेकडीवर बांधले गेले होते. पूर्वीच्या काळी या जंगल पट्ट्यात जाताना भीती वाटत होती. त्यामुळे गावातच देवीचे एक मंदिर बांधण्यात आले. गावकरी आणि पंचक्रोशीतील भाविक कालांतराने गावातील देवीच्या मंदिरातच पूजा, आराधना करतात. त्यामुळे डोंगरावरील प्राचीन मंदिराकडे दुर्लक्ष होत गेले. राजे यांच्या काळात सिंदखेड येथील वाड्यावर लक्ष ठेवले जाईल, अशा पद्धतीने येथील व्यवस्था होती. त्यामुळे देवीचे हे मंदिर प्राचीन धरोहर आहेच; पण ते या पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे या भग्नावस्थेत असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार होण्याची गरज आहे.
देवीच्या या डोंगरावर गेल्यास मराठवाड्यातील तलाव सावंगी, कारखाना रामनगर ही गावे दिसतात, तर सिंदखेडराजा शहरासह या परिसरातील जंगलावरदेखील लक्ष ठेवले जाऊ शकते. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तयार करणे, मंदिराची डागडुजी करून दिवाबत्तीची व्यवस्था करणे, मंदिराचा इतिहास शोधून त्याची माहिती या परिसरात लावण्यास अनेक कामे हाती घेण्याची गरज आहे. परंतु, सध्या पुरातन विभागाच्या दुर्लक्षामुळे या मंदिराची दुरवस्था पाहावयास मिळत आहे.
मंदिर आजही देते गतवैभवाची साक्ष
सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी टाका येथील देवीच्या मंदिराची पडझड झाली असली, तरी हे मंदिर बऱ्याच प्रमाणात गतवैभवाची साक्ष देते. तिथे उभे असलेले हे नितांत सुंदर वास्तुशिल्प आजही येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधते. शिवणी टाका परिसराचा हा ऐतिहासिक वारसा आज जपण्याची गरज आहे.
शिवणी टाका परिसर दुर्लक्षित
पुरातन मंदिराच्या नूतनीकरणाकडे शासनाने लक्ष केंद्रित केलेले आहे. अनेक ठिकाणी जुन्या मंदिराचे कामही सुरू आहे. परंतु शिवणी टाका परिसरातील मंदिर दुर्लक्षितच राहिले आहे. या मंदिराच्या शिळा केव्हाही कोसळू शकत असल्याने येथील भक्तांना धोका निर्माण झाला आहे.