खामगावात विरोध मावळला; पालिकेत ‘सकारात्मक’तेची नांदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:13 AM2017-12-27T01:13:45+5:302017-12-27T01:14:42+5:30
खामगाव: घाटाखालील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील परस्पर विरोधी राजकीय घडामोडींचा डंका संपूर्ण जिल्ह्यात आहे; मात्र कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली देत, विकास कामांच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधार्यांमधील कटूता मावळत असल्याचे चित्र आहे. परिणामी, खामगाव पालिकेतील राजकारण सकारात्मकतेच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.
अनिल गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: घाटाखालील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील परस्पर विरोधी राजकीय घडामोडींचा डंका संपूर्ण जिल्ह्यात आहे; मात्र कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली देत, विकास कामांच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधार्यांमधील कटूता मावळत असल्याचे चित्र आहे. परिणामी, खामगाव पालिकेतील राजकारण सकारात्मकतेच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.
खामगाव मतदार संघातील बलाढय़ स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून खामगाव नगरपालिकेकडे पाहिल्या जाते. या नगरपालिकेतील राजकीय घडामोडींचा प्रभाव मतदार संघात पडतो. परिणामी, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शह-काटशहाचे राजकारण इथे रंगते. पालिका सभागृहातील घडामोडीचे थेट पडसाद बाहेर(मतदार संघात) उमटतात. त्यामुळे खामगाव नगरपालिकेतील राजकारणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. सद्यस्थितीत खामगाव नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. तर काँग्रेस येथे विरोधी पक्षाची भूमिका अदा करीत आहे. दरम्यान, खामगाव पालिकेत ‘परिवर्तना’ची म्हणजेच भाजपची सत्ता आल्यापासून डिसेंबर अखेरीस सुमारे १0 सर्वसाधारण आणि विशेष सभा पार पडल्या. यापैकी बहुतांश सभा या सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधामुळेच गाजल्या. फेब्रुवारी २0१७ ते नोव्हेंबर २0१७ पर्यंत पार पडलेल्या १ जुलै २0१७ च्या सर्वसाधारण सभेचा (एका विषयापुरता) अपवाद वगळता सर्वच सभा या वादळी ठरल्या. १ जुलै २0१७ रोजी नगर परिषदेमध्ये आयोजित सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचा हा ठराव सर्वानुमते संमत झाला होता; मात्र तत्पूर्वी पालिकेत ‘श्रेया’वरून राजकारण रंगले होते, हे येथे उल्लेखनीय!
१९ डिसेंबरची सभा ठरली ‘खास’!
४७ विषयांना मंजुरी देण्यासाठी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली. यासभेत विषयसूचीवरील ६ विषय वगळता उर्वरित ३३ विषयांच्या मंजुरीला विरोधकांच्या विरोधाचा सूर मावळता होता. दरम्यान, तब्बल पहिल्यांदाच एक-दोन नव्हे तर आठ विषय सर्वानुमते (सत्ताधारी-विरोधकांच्या सहमतीने) मंजूर झाले. पालिकेच्या इतिहासात ही सभा महत्त्वपूर्ण ठरली. एकाचवेळी आठ विषयांच्या सहमतीमुळे ही सभा पालिकेतील सकारात्मकतेची नांदी असल्याची चर्चा आहे.
शहरातील रेंगाळलेल्या विविध विकास कामांना गती देण्याची गरज आहे. दरम्यान, शहरातील विकास कामांच्या मुद्यावर राजकारण न करता एकत्र येण्याची गरज आहे. विकास कामासाठी आपला विरोध नाही.
- विजय वानखडे, नगरसेवक, भारिप- बमसं, खामगाव
सत्ताधार्यांकडून बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी केली जाता कामा नये. विकासासाठी आमचा तत्त्वत: विरोध असणार नाही; मात्र सत्ताधार्यांच्या चुकीच्या धोरणाला राष्ट्रवादीचा विरोध कायम असेल.
- देवेंद्र देशमुख, नगरसेवक, तथा शहरअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
शहराचा सर्वांगीण विकास साधत, विविध विकास कामांना सत्ताधार्यांचा प्राधान्यक्रम राहतो; मात्र प्रत्येक सभेत विषयांतर करीत गोंधळ घालण्याचे विरोधकांचे प्रयत्न राहतात. विकासाची काळजी विरोधकांनाच नसून आमची भूमिका विकासाचीच आहे.
- अनिता डवरे, नगराध्यक्ष, खामगाव.