दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षाविषयी संभ्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:07 PM2020-09-08T12:07:43+5:302020-09-08T12:07:51+5:30
अमरावती विभागातील दहावीच्या ८ हजार १४२ तर तर बारावीच्या ११ हजार २९१ विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागला आहे.
- संदीप वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: दहावी, बारावीचे निकाल जाहीर करून महिनाभराचा अवधी झालेला असताना पुर्नपरीक्षाविषयी शासनाने कुठलीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे, अमरावती विभागातील दहावीच्या ८ हजार १४२ तर तर बारावीच्या ११ हजार २९१ विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागला आहे. दरवर्षी जून मध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर पुर्नपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. यावर्षी मात्र, वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.
कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या निकालाला बराच विलंब झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर पुर्नपरीक्षांचे वेळापत्रकाची घोषणा होणे अपेक्षीत होते. कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकार कुठलीही परीक्षा घेण्याच्या मनस्थितीत नाही. एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, दहावी, बारावीच्या परीक्षा होणार किंवा नाही याविषयी विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अमरावती विभागातून इयत्ता बारावीच्या १ लाख ४२ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एक लाख ३१ हजार ४३४ विद्यार्थी उत्तीर्ण तर ११ हजार २९१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच इयत्ता दहावीच्या एक लाख ६७ हजार ४५५ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ५९ हजार ३१३ उत्तीर्ण झाले आहेत. तसेच ८ हजार १४२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्ये परीक्षा घेण्यात येत होती.
यावर्षी कोरोना संसर्गामुळे दहावी, बारावीचे निकालच उशीरा जाहीर करण्यात आले. त्यामुळे, अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना पुर्नपरीक्षांची घोषण केव्हा होईल,याची प्रतीक्षा लागलेली आहे. राज्य सरकारने परीक्षांविषयी भुमिका स्पष्ट करण्याची मागणी पालकांनी केली आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना याच वर्षी प्रवेश मिळावा, यासाठी पुर्नपरीक्षा होणे आवश्यक आहे. त्यामुळे, शासनाने दहावी आणि बारावीच्या नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा फटका
महाराष्ट राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षांचे निकाल दरवर्षी जून महिन्यात जाहीर करण्यात येतात. यावर्षी कोरोना संसर्गाचा फटका या परीक्षांनाही बसला आहे. दहावीचा एक पेपर रद्द करण्यात आला होता. पेपर तपासण्यातही विलंब झाल्याने अखेर निकाल जुलैमध्ये जाहीर करण्यात आले. मात्र, पुर्नपरीक्षा केव्हा होणार याविषयी निर्णयच झाला नाही. पुर्नपरीक्षा घेवून ताततडीने निकाल जाहीर करण्याची मागणी होत आहे.
३३६० नापास विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा
४जिल्ह्यातील ४० हजार २९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३८ हजार ४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तसेच १ हजार ५६० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १२ वी चे जिल्ह्यातील ३१ हजार १६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १ हजार ८०० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
अकरावी प्रवेशही संकटात
यावर्षी पुर्नपरीक्षेविषयी निर्णय झाला नसल्याने साशंकता आहे. परीक्षा उत्तीर्ण करून ११ वीमध्ये प्रवेश मिळणे कठिण असल्याचे चित्र आहे. कारण ११ वी प्रवेशासाठी ३१ आॅगस्ट ही शेवटची मुदत होती. पुर्नपरीक्षेविषयी निर्णय न झाल्याने ११ प्रवेश संकटात सापडले आहेत.