शाळा बंद झाल्याने परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:51+5:302021-02-23T04:51:51+5:30
बुलडाणा : जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात ८१९ परीक्षार्थी आहेत. परंतु, कोरोना विषाणू संसर्गाच्या ...
बुलडाणा : जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात ८१९ परीक्षार्थी आहेत. परंतु, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा नेमकी कशी होणार, केव्हा होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ही परीक्षा ठरलेल्या नियोजनानुसार आणि ऑफलाइनच होणार असल्याची माहिती नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी दिली आहे.
सीबीएसई दिल्लीद्वारे देशभरात घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी प्रवेशाकरिता चाचणी परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना १५ दिवसांपूर्वीच प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय आहे. या विद्यालयामध्ये इयत्ता नववीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता चाचणी परीक्षा घेण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यातून एक हजारपर्यंत विद्यार्थी या परीक्षेला बसतात. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या गुणवत्तेनुसार निवडयादी ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येते. परीक्षा दोन दिवसांवर आलेली आहे. परंतु, मध्येच पुन्हा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवाहर नवोदय विद्यालयाची नियोजित परीक्षा कशी होणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. यासंदर्भात नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता, परीक्षा नियोजनानुसार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सीबीएसई दिल्लीद्वारे देशभरात पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी प्रवेशाकरिता चाचणी परीक्षा २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेतच घेण्यात येणार आहे.
पाल्यांना परीक्षेला पाठविण्याची भीती
जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. परंतु, कोरोना रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे आता पाल्यांना परीक्षेला पाठविण्याची भीती पालकांमध्ये आहे. जिल्ह्यातील परीक्षार्थी सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा हे शेगाव येथेच होणार आहे. शेगाव येथील तीन केंद्रांवर या परीक्षेचे नियोजन केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा ही ऑफलाइन आणि ठरलेल्या नियोजनानुसारच होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर साडेनऊ वाजताच उपस्थित राहावे. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रवेश दिले जाणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ही परीक्षा घेण्यात येईल.
राजेंद्र कसर, प्राचार्य,
जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव
परीक्षा केंद्र आणि विद्यार्थी
जवाहर नवोदय विद्यालय शेगाव ३६४
बुरुंगले विद्यालय शेगाव २३२
राष्ट्रमाता इंदिरा गांधी हायस्कूल शेगाव २२३